भाजपने पुढाकार घेऊन हरियाणा आणि महाराष्ट्रात गोमांसाच्या विक्रीवर बंदी आणली असली तरी गोव्यात अशाप्रकारची बंदी घालण्यात येऊ नये, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आम्हाला येथील लोकांच्या खाद्यसंस्कृतीत कोणताही हस्तक्षेप करायचा नसल्यामुळे गोवा सरकार गोमांसावर कधीही बंदी घालणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मला राज्यातील सर्व लोकांसह ३८ टक्के अल्पसंख्याक जनतेचीही काळजी घेतली पाहिजे. गोव्यात सुमारे ३० टक्के ख्रिश्चन आणि ८ टक्के मुसलमान लोकसंख्या आहे. ते नुकतेच गोमांस खायला लागलेत अशातला भाग नाही, फार पूर्वीपासूनच गोमांस हा त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे. मग मी त्यावर बंदी घालणे योग्य ठरेल का, असा सवाल पार्सेकर यांनी द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना उपस्थित केला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांत भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोहत्याप्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीखाली गोमांसाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. यासंदर्भात पार्सेकरांना विचारले असता, प्रत्येक राज्याला स्वत:चा दृष्टीकोन असल्याचे सांगितले. मी त्याविषयी भाष्य करणार नाही. मात्र, गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून गोमांसावर राज्यात कधीही बंदी घालणार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता त्यांनी घेतलेल्या पवित्र्याविषयी भाजपमधून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, गोव्यात गेल्या काही दिवसांपासून गोमांसाची विक्री थांबविण्यासाठी व्यापारांवर दबाव आणला जात आहे. यासाठी गायींची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून गाडीच्या चालकाला मारणे आणि गाडीतील सगळ्या गायी सोडून देणे यांसारखे प्रकार घडत असल्याची येथील व्यापारांची तक्रार आहे. मात्र, गोमांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अशी कोणतीही अडचण असेल तर, त्यांनी शासनाकडे तक्रार करावी, असे पार्सेकरांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beef part of food habit in goa wont ban it laxmikant parsekar