‘बेस्ट’वर ब्रीदवाक्यांचा पाऊस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेस्टचे ब्रीदवाक्य सूचवा आणि वातानुकूलित बस गाडीचा पास मिळवा, असे आवाहन करताच प्रवाशांनी बेस्टकडे ब्रीदवाक्याचा पाऊस पडला आहे. केवळ काही तासांत अनेक प्रवाशांनी प्रत्येकी पाच ते सात ब्रीदवाक्ये पाठवली आहेत. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत शेकडो ब्रीदवाक्ये बेस्टकडे उपलब्ध होणार असल्याचा दावा बेस्टचे अधिकारी करत आहेत.

विश्वासाचा ठेवा, बेस्ट बस सेवा.., मुंबईचा श्वास, बेस्ट प्रवास.. जलद, सुखद, सुरक्षित.., नेहमीच मुंबईच्या सेवेशी बेस्ट. पर्यावरण प्रेमींची पहिली पसंती ‘बेस्ट’ अशी एकांहून एक ‘बेस्ट’ ब्रीदवाक्ये प्रवाशांकडून पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बेस्ट उपक्रमात प्रवाशांशी निगडित असलेल्या कोणत्याच योजनेत प्रवाशांना कधीच विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार प्रवाशांकडून नेहमीच केली जाते. त्याची दखल घेत प्रशासनाने बेस्टचे नवीन ब्रीदवाक्य प्रवाशांनी सुचवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ब्रीदवाक्य सुचवणाऱ्या प्रवाशांना तीन महिन्यांचा वातानुकूलित गाडीचा तसेच सहा महिन्यांचा साध्या बस गाडीचा पास पारितोषिक म्हणून दिला जाणार आहे. यात बेस्टकडून सर्वोत्कृष्ट ब्रीदवाक्य सुचवणाऱ्याला तब्बल १४ हजार ४०० रुपये किमतीचा तीन महिन्यांचा वातानुकूलित बस गाडीचा तसेच जलद, मर्यादित आणि साध्या बस गाडीचा पास किंवा १० हजार ८० रुपये किमतीचा सहा महिन्यांचा संपूर्ण मुंबईभर प्रवास करता येईल, असा जलद, मर्यादित आणि साध्या बस गाडीचा बस (यापैकी कोणताही एक) पारितोषिक म्हणून दिला जाणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नागरिकांनी ब्रीदवाक्यासह नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक १० जूनपर्यंत probestundertaking@gmail.com  या ई-मेल आयडीवर पाठवावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best bus slogan