लाखों रुपयांची वीज वापरून ग्राहकांनी महिनोन्महिने विजेचे बिल न भरल्याने बेस्ट प्रशासनाची आर्थिक स्थिती पूर्णत: बिघडली होती. ही स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात कारवाई करत साठ कोटींहून अधिक रक्कम वसूल केली आहे. डिसेंबरअखेर वीज ग्राहकांनी बेस्टचे २०० कोटी रुपये थकवले होते. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलत थकबाकीदारांविरोधात कारवाई करत चांगलाच ‘शॉक’ दिला आहे.
सध्या मुंबई विभागातून पाच ते दहा लाखांपर्यंत विजेचे बिल न भरलेले दोन, एक ते पाच लाखांदरम्यान थकबाकी असलेले २६१ ग्राहक आहेत. तर तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या हजारोंवर आहे. यात जानेवारी ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान बेस्टने थकबाकी असलेल्या सुमारे १० हजार ८९१ ग्राहकांच्या विजेचे मीटर काढले होते. यानंतर ६ हजार १६८ ग्राहकांनी वीज बिल भरल्याने बेस्ट प्रशासनाने पुन्हा मीटर बसवून दिले. यात न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून अविवादित ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यास प्राधान्य दिले जात आहे. बेस्टच्या थकबाकीदारांच्या यादीत पोलीस आयुक्तालय, शासकीय कार्यालय, रुग्णालये, खासगी आस्थापने आणि घरगुती ग्राहकांचा समावेश होता. यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेस्ट समितीच्या सदस्यांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर शासकीय आस्थापने, कार्यालयांच्या थकीत रक्कमेपैकी ५० टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. याशिवाय खासगी ग्राहकांकडून तातडीने वीज बिल थकबाकी वसूल करण्यात येत असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

बेस्टचा नवीन उपक्रम
ग्राहकांची वीज बिल भरताना गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासन नवीन उपक्रम हाती घेणार आहे. यात घरगुती वीजग्राहकांना तक्रार करताना ग्राहक क्रमांक अथवा बिलाची संपूर्ण माहिती देण्याची गरज भासणार नसून केवळ इमारतीचे नाव, जवळचा रस्ता असा तपशील पुरेसा ठरणार आहे.