राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिएर) विभागाने प्रकाशित केलेल्या ‘प्रवरा खोरे’ या गॅझेटिअरची विशेष दखल ‘भारतीय जलसंस्कृती मंडळा’ने घेतली आहे. १३ आणि १४ मार्च रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या नवव्या जल साहित्य संमेलनात या कामाबद्दल गॅझेटिअर विभागाचा खास गौरव करण्यात येणार आहे.
डॉ. माधवराव चितळे यांच्या प्रेरणेतून आशियाई विभागासाठी हे मंडळ स्थापन झाले असून पाण्याचे व्यवस्थापन आणि या विषयी समाजात जनजागृती करण्याचे काम मंडळातर्फे केले जाते. जल साहित्य संमेलन, जल साक्षरता, पर्यावरण आदी उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाचे काम चालते.
देशात प्रत्येक राज्यात जलव्यवस्थापनविषयक विभाग आणि गॅझेटिअर विभाग कार्यरत आहे. मात्र एखाद्या नदी खोऱ्याविषयी अभ्यासपूर्ण असा ग्रंथ शासनाच्या दर्शनिका विभागाने पहिल्यांदाच प्रकाशित केला आहे. नदी खोऱ्यातील प्रयोगांची माहिती आणि भविष्यातील जल व्यवस्थापनाची दिशा देण्याचे काम ‘प्रवरा खोरे’ या गॅझेटने केले आहे. दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. अरुणचंद्र पाठक व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे काम केले.
औरंगाबाद येथील जल साहित्य संमेलनात या कामाबद्दल भारतीय जल संस्कृती मंडळाकडून गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी कळविले आहे.