भारतीय समाजव्यस्थेच्या तळाशी दडपल्या गेलेल्या वंचित, उपेक्षित, अन्यायग्रस्त समाजाच्या जगण्याचे धगधगते वास्तव आपल्या कथा, कादंबरी, कविता आणि नाटय़ संहितेतून मांडणारे ज्येष्ठ दलित साहित्यिक भीमसेन देठे (वय ७० वर्षे) यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. आंबेडकरी चळवळीशी नाळ जोडलेला जुन्या पिढीतील एका प्रथितयश लेखकाच्या निधनाबदल सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्य़ातील मंचर या खेडेगावात जन्मलेले भीमसेन देठे प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांना कथा, कविता लिहिण्याची पहिल्यापासून आवड होती. पुढे दलित साहित्याबरोबर, दलित पँथर ही तरुणांची जहाल संघटना उदयास आली. त्यात साहित्यिकांचा जास्त भरणा होता. दलित चळवळीच्या प्रभावाखाली देठे यांचे साहित्य अंकुरत गेले.
त्यांनी कथा, कादंबरी, कविता, नाटक अशा साहित्याच्या सर्वच प्रांतात दमदार मुशाफिरी केली. परंतु त्यांचे लेखन हे सामाजिक वास्तवाला भिडणारे होते. उपेक्षित, वंचित, व्यवस्थेने बहिष्कृत केलेला समाज हा त्यांच्या कथा-कादंबरीचा नायक होता.
भीमसेन देठे हे सरकारी नोकरीत होते. त्यांनी विपुल लेखन केले. शेवटपर्यंत त्यांनी लेखणी खाली ठेवली नाही. १९९४ च्या दरम्यान, त्यांची वेश्येंच्या जीवनसंघर्षांवर बेतलेली कादंबरी तुफान गाजली. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन केले. दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कथालेखनावरील संशोधनाबद्दल पीएचडी मिळाली. राज्य शासनाने त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
देठे यांचे डबुलं, इस्कोट, रिडल्स, तुफानातील दिवे, घुसमट, गिऱ्हाण हे कथासंग्रह वाचकप्रिय ठरले. इस्कोट कथासंग्रह चांगलाच गाजला. चक्री या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले. योद्धा व बांडगूळ ही नाटके त्यांनी लिहिली. नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर, गोदुताई परुळेकर, मधु मंगेश कर्णिक, प्र. श्री. नेरुरकर, डॉ. गंगाधर पानतावणे, वामन होवाळ, दया पवार इत्यादी पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ साहित्यिकांशी त्यांचे जवळचे संबंध होते.
साहित्याबरोबरच आंबेडकरी चळवळीतही ते सक्रिय होते. गेल्या वर्षांपासून ते रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. मालाड येथे रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.