ऊर्जा खात्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून सुमारे २० हजार कोटी रूपये खर्च करूनही महानिर्मिती कंपनीची वीजनिर्मिती कमी होत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करीत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी विधानपरिषदेत केली. त्यावर कोणत्याही सचिवांकडून चौकशीची तयारी दाखवत सहा महिन्यांत अहवाल आल्यावर कोणाची बाजू खरी, हे आपण जनतेसमोर मांडू, असे आव्हान उपमुख्यमंत्र्यांनी दिले. चौकशी समितीपुढे कागदपत्रे व पुरावे सादर करून भ्रष्टाचार सिध्द केला जाईल, असे तावडे यांनी सांगितले.
महानिर्मिती कंपनीच्या १३ औष्णिक ऊर्जा प्रकल्पांवर २००४ ते २०१२ या काळात सुमारे २० हजार कोटी रूपये खर्च झाले. तरीही ५७३० मेगावॉटची वीजनिर्मिती वाढीचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. अपेक्षित वीज नसल्याने खासगी वीज कंपन्यांकडून गेल्या वर्षी ४५०० कोटी रुपयांची वीज खरेदी करण्यात आली व त्यातील एक हजार कोटी रूपयांचा भार ग्राहकांच्या माथी टाकण्यात आला. खासगी कंपन्यांकडून निविदा काढून २५०० कोटी रूपयांची वीज ३.८१ रुपये प्रतियुनिट एवढय़ा कमी दराने खरेदी केली.