पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची साद घातल्यानंतर महापालिकेने मुंबई हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने झोपडीमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. झोपडपट्टीवासीयांकडून झोपडीत शौचालय बांधण्यास प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र झोपडपट्टय़ांच्या आसपास मलनि:सारण वाहिन्यांचे जाळेच नसल्यामुळे झोपडीमध्ये शौचालय बांधण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या असून इच्छुकांचे अर्ज पालिकादरबारी पडून आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर पालिकेने मुंबईत साफसफाईची मोहीम व्यापक प्रमाणावर हाती घेतली. त्याचबरोबर मुंबई हागणदारीमुक्त करण्याचाही विडा उचलला. मुंबईमध्ये तब्बल ७४० छोटय़ा-मोठय़ा झोपडपट्टय़ा असून सुमारे ६० लाख नागरिक झोपडपट्टय़ांच्या आश्रयाला आहेत. झोपडपट्टय़ांमधील तब्बल दहा लाख कुटुंबांतील सदस्यांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागत आहे. सार्वजनिक शौचालयांची संख्या अपुरी असल्यामुळे मुंबईत आजही अनेक ठिकाणी रस्त्यावर, रेल्वे मार्गालगत प्रात:र्विधी उरकले जातात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिकेने झोपडपट्टीमध्येच शौचालय बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या योजनेची घोषणा केल्यापासून आजपर्यंत तब्बल २,३७१ झोपडपट्टीवासीयांनी झोपडीमध्ये शौचालय बांधण्यासाठी पालिकादरबारी अर्ज सादर केले. आतापर्यंत ५०४ झोपडय़ांमध्ये शौचालय बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यापैकी १०० शौचालये बांधून झाली आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
झोपडपट्टय़ांलगत मलनि:सारण वाहिनी नसल्यामुळे झोपडीत शौचालय बांधण्यास अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. झोपडपट्टीवासीयांच्या १,८६७ अर्जाची छाननी सुरू असून अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिनी नसल्यामुळे झोपडीमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी देणे अवघड बनले आहे. मात्र दोन बैठय़ा चाळीच्या मधल्या मोकळ्या जागेत शक्य असलेल्या ठिकाणी एक संयुक्त मलनि:सारण वाहिनी टाकण्यात आली असून झोपडीतील मलवाहिनी त्यास जोडण्यात आली आहे. अशा पद्धतीने भांडुप आणि मुलुंड भागात मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे उभारून झोपडीत शौचालये बांधण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत झोपडीमध्ये शौचालय बांधण्याच्या योजनेला केंद्र सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात झोपडीमध्ये शौचालय बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. परिणामी, झोपडपट्टीमध्ये इतर कामांसाठी प्रस्तावित केलेला निधी तेथे मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी वापरण्याच्या सूचना प्रशासनाने अधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र आता पालिकेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात प्रशासनाने या कामासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शक्य तिकडे मलनि:सारण वाहिनी टाकून अथवा सेफ्टी टँकच्या पर्यायाचा वापर करून झोपडीमध्ये शौचालय उपलब्ध करण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु सेफ्टी टँकचा वापर करून झोपडीत शौचालय बांधण्यास अद्याप कुणीच पुढे आलेले नाही, अशी खंत या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc decided to allow toilet to build in hut