मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव, पावसाच्या लपंडावामुळे लागू केलेली पाणीकपात, अस्वच्छता असे अनेक प्रश्न  भेडसावत असताना मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्यांना अंदमान दौऱ्याचे वेध लागले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींचे दर्शन घेण्यासाठी स्थायी समिती सदस्यांना अंदमानला घेऊन चला, अशी मागणी सभागृह नेत्यांनी स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत केली. त्यामुळे सर्वच सदस्य अवाक्  झाले.
विश्व मराठी साहित्य संमेलनाला निधी देण्यावरून चर्चा सुरू असताना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी अचानक  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेले कारागृह, त्यांना कोणत्या यातना भोगाव्या लागल्या याची प्रत्यक्ष कारागृहात जाऊन पाहणी करता येईल, तसेच आसपासच्या निसर्गसंपन्न परिसराची सफरही घडेल, असे सांगत तृष्णा विश्वासराव यांनी दौऱ्याची मागणी रेटली.