मुंबई : करोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींच्या उत्पादक कंपन्यांनी लशींची विक्री किंमत कमी केल्यामुळे आता खासगी रुग्णालयात १८ ते ५९ वयोगटासाठी वर्धक मात्रा ३८६ रुपयांना उपलब्ध झाली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने  खासगी रुग्णालये आणि आरोग्य कंपन्यांच्या नफेखोरीला पाठबळ देत  थेट उत्पादकांमार्फत लस खरेदीचे अधिकार मे २०२१ मध्ये दिले. परिणामी लशींची साठेबाजी आणि लस तुटवडा मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला. या  कंपन्यांसाठी विक्रीचे दरही सरकारच्या तुलनेत जास्त ठेवल्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या लशींच्या मात्रांची किंमतही ७०० ते १४०० रुपयांच्या घरात गेली. केंद्रीय आरोग्य विभागाने १० एप्रिलपासून १८ ते ५९ वयोगटासाठी सशुल्क वर्धक मात्रेचे लसीकरण सुरू केले आहे. सशुल्क असल्यामुळे ही मात्रा आता केवळ खासगी रुग्णालयातच उपलब्ध झाली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही उत्पादकांनी लशीची विक्री किंमत २२५ रुपयांपर्यत कमी केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. तसेच  विक्री किंमतीवर जास्तीत जास्त १५० रुपये आकारण्याची मुभा केंद्राने नव्याने काढलेल्या सूचनांमध्ये दिली आहे.

खासगी रुग्णालयांनी याआधी यापेक्षा जास्त दराने लसखरेदी केल्यामुळे जुन्या किंमतीनेच लसीकरण करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावर कंपन्यांनी ज्या खासगी रुग्णालयांनी या लशींच्या मात्रा ज्यादा दराने आधी खरेदी केल्या आहेत, त्यासोबत समायोजन करून नव्या मात्रा देण्याचे कबूल केले आहे.  त्यामुळे खासगी रुग्णालयांनी लशीच्या किंमती कमी करत आता ३८६ रुपयांवर आणल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लशी ३८६ रुपयांना उपलब्ध झाल्या आहेत. मुदत बाह्य झालेल्या लशी बदलून न दिल्यामुळे लसीकरणामध्येही सहभागी होण्यासाठी खासगी रुग्णालये आधी फारशी तयार नव्हती. परंतु समायोजनासाठी कंपन्यांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे आता अनेक रुग्णालये लसीकरणामध्ये सहभागी होण्यास तयार झाली आहेत. वर्धक मात्रा सुरू केल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुन्हा लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी आहे. सध्या साठा शिल्लक असून आता समायोजन करूनही नवीन साठा मिळणार आहे. त्यामुळे लसीकरण सुरू असेल, असे कोकिळाबेन रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष शेट्टी यांनी सांगितले.

खासगी रुग्णालये लसीकरण करण्यासाठी तयार असून नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे, याकडे लक्ष लागले आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा साठाही खरेदी केला जाईल.

– डॉ. गौतम भन्साळी, खासगी रुग्णालयांचे समन्वयक