गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित ‘झी’ टीव्हीवरील ‘बुद्ध’ या मालिकेतील आशय आक्षेपार्ह आणि संबंधित धर्मीयांच्या भावना दुखावणारा आढळून आला तरच मालिकेवर बंदी घातली जाईल. मात्र आरोप उथळ असल्याचे आढळले तर मात्र हस्तक्षेप करणार नाही, असे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने बजावले.
‘समता सैनिक दला’तर्फे करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेतील दाव्यानुसार, मालिकेत बुद्धाचे जीवन दाखविताना कोणतेही संशोधन वा अभ्यास केलेला नाही. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि धम्म’ या पुस्तकाचाही विचार करण्यात आलेला नाही. मालिकेत बुद्धाच्या जन्मासाठी त्याचे वडील शुद्धोधन यांनी ‘पुत्रकामेष्ठी यज्ञ’ केल्याचा चुकीचा संदर्भ दाखविला आहे. ब्राह्मणांना संस्कृत पठण करताना दाखविण्यात आले आहे. वास्तवात बौद्ध आणि हिंदू धर्माचा परस्परांशी काहीच संबंध नाही. तसेच काही पात्रेही काल्पनिकरीत्या दाखविण्यात आलेली आहेत. या सगळ्यांमुळे बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात असून न्यायालयाने मालिकेच्या प्रसारणावर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, मालिकेचे निर्माते बी. के. मोदी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पटकथाकार, वाहिनीप्रमुख, प्रसारण आशय तक्रार परिषद आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
‘आक्षेपार्ह वाटल्यास ‘बुद्ध’ मालिकेवर बंदी’
गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित ‘झी’ टीव्हीवरील ‘बुद्ध’ या मालिकेतील आशय आक्षेपार्ह आणि संबंधित धर्मीयांच्या भावना दुखावणारा आढळून आला तरच मालिकेवर बंदी घातली जाईल.
First published on: 01-02-2014 at 12:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha series to ban if found objectionable