मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर पथकाने मंगळवारी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या बनावट नोटांचा तस्कर हा एका माजी मंत्र्याच्या इमारतीत राहणाऱ्या बिल्डरचा अंगरक्षक असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हरही सापडले आहे. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला त्याने माजी मंत्र्यांचे नाव घेतले असावे, असे सूत्रांनी सांगितले.
अंधेरी पूर्वेतील इम्पिरिअल हॉटेलजवळ मंगळवारी संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे १२ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा त्याच्याकडे आढळून आल्या. नेपाळमार्गे या नोटा मुंबईत आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला त्याला ताब्यात घेण्यात आले तेव्हा या बनावट नोटा नसल्याचेही तो पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होता. मात्र मिळालेली माहिती इतकी पक्की होती की, सखोल चौकशीत या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल, असे एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.