छोटा शकीलच्या नावाने खंडणी उकळण्यासाठी गुंडांनी स्पूफ कॉलचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून गुंडांनी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. या अशा दूरध्वनी यंत्रणेत फोन करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक न दिसता अन्य कुणाचाही क्रमांक दिसतो; परंतु खंडणी विरोधी पथकाने मोठय़ा कौशल्याने तपास करून या गुंडाला अटक केली.
एका बांधकाम व्यावसायिकाला छोटा शकीलच्या नावाने परदेशातून आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून खंडणीसाठी दूरध्वनी येत होते. सुरुवातीचे दूरध्वनी इंटरनेट कॉलचा (व्हीओआयपी) वापर करून केले जात होते. मात्र नंतर येणारे दूरध्वनी हे त्या व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवरून येत होते. दूरध्वनीवरून खंडणी मागणाऱ्या गुंडांचा आवाज होता; परंतु मोबाइल क्रमांक कर्मचाऱ्यांचा होता. ‘स्पूफ कॉल’द्वारे अशा प्रकारे कॉल्स करता येतात. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विनायक वत्स यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी दुसरी पद्धत वापरली.
मुख्य आरोपी हा व्यवसायाने खाटीक असून मालाड येथे मटण विक्रीचे दुकान आहे. त्याच्या फरार साथीदारांच्या मदतीने त्यांनी ही योजना बनवली.
या बांधकाम व्यावसायिकाची माहिती काढून त्यांनी स्पूफ कॉल करून खंडणी मागू लागले. एका महिलेला त्यांनी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. जेव्हा खंडणीची रक्कम घ्यायची वेळ आली तेव्हा या आरोपींनी महिलेला कर्जाची रक्कम घेण्यास जा, असे सांगून पाठवले आणि ती पोलिसांच्या हाती लागली. मात्र नंतर खरा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून मुख्य आरोपीला अटक केली. विनायक वत्स, विनायक मेर, सचिन कदम, संजीव धुमाळ, राजू सुर्वे, संतोष नाटकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पूफ म्हणजे काय?
इंटरनेटवर उपलब्ध असणारे हे सॉफ्टवेअर आहे. ते डाऊनलोड करून कॉल केल्यानंतर आपला नंबर समोरच्या व्यक्तीला दिसत नाही. आपल्याला जो क्रमांक दाखवायचा आहे तो क्रमांक आपण दाखवू शकतो. त्यामुळे फोन घेणारा व्यक्ती चक्रावून जातो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caller id spoofing use for ransom