शीना बोरा हत्या प्रकरण
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्या आवाजाचे नमुने घेऊ देण्याची मागणी सीबीआयने सोमवारी एका अर्जाद्वारे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली. न्यायालयाने त्याची दखल घेत इंद्राणीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
इंद्राणी आणि अन्य आरोपी तसेच हत्याकांडातील अन्य दुव्यांचा शोध घेण्याच्या हेतूने मोबाइलवरील भाषणाबाबतच्या पुराव्यांची शहानिशा करायची आहे. त्यामुळे इंद्राणीच्या आवाजाच्या नमुन्यांची गरज आहे. त्यामुळे तिच्या आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती सीबीआयच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यानंतर इंद्राणीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, इंद्राणीचा चालक श्यामवर राय याने न्यायालयाला पत्र लिहून आपल्याला सत्य सांगायचे असल्याचा दावा केला होता. त्यानुसार त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्याशी काही वेळ एकांतात संवाद साधला. त्यानंतर त्यालाही मंगळवारी पुन्हा हजर करण्याचे आदेश दिले.
