केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) एका फौजदाराने विक्रोळी येथील टागोर नगरमधील आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. कौटुंबिक कलहातून या फौजदाराने आत्महत्या केल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली.
टागोर नगरमधील ग्रुप नं. ७ मध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहणारे दयाराम मढव हे सीबीआयमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. येत्या वर्षांत ते सेवा निवृत्त होणार होते.
सोमवारी दुपारी पती-पत्नीचे भांडण झाले. संतापलेल्या दयाराम झोपण्याच्या खोलीत निघून गेले. मात्र आतून बराच वेळ झाला तरी आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या घाबरल्या आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता पंख्याला गळफास लावलेले दयाराम दृष्टीस पडले.