केंद्र सरकारचे झेंडाबंधन..; घरोघरी राष्ट्रध्वज अभियानाच्या आग्रहामुळे अनेक अडचणींची शक्यता

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्यदिनी देशभरातील प्रत्येक घरांवर आठवडाभर राष्ट्रध्वज फडकवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्यदिनी देशभरातील प्रत्येक घरांवर आठवडाभर राष्ट्रध्वज फडकवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या या झेंडा बंधनामुळे देशभरातील सुमारे १० कोटी घरांवर फडकविण्यासाठी ध्वज तयार करणे, त्याच्या संहितेचे पालन करणे, वापरून झाल्यावर अवमान होणार नाही याची खबरदारी घेणे हे मोठे आव्हान असेल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान देशातील १० कोटी घरांवर सात दिवस राष्ट्रध्वज फडकविण्याचे ‘घरोघरी राष्ट्रध्वज’(हर घर झेंडम) अभियान राबविण्यात येणार असून राज्यात एक ते सव्वा कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी राज्य सरकारनेही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षांत नागरिकांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सेनानी, देश रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मरण करतानाच राष्ट्रप्रेम, देशभक्तीची भावना लोकांमध्ये जागृत करण्यासाठी यंदाचा स्वातंत्र्यदिन नेहमीपेक्षा वेगळय़ा पद्धतीने साजरा करण्याची कल्पना केंद्र सरकारने आखली आहे. त्यासाठी सलग सात दिवस घरांवर झेंडा फडकविण्याचा केंद्राचा आग्रह आहे. 

मात्र, ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांना ध्वजसंहितेची तेवढी माहिती नाही. त्यामुळे सात दिवस सकाळी राष्ट्रध्वज फडकविणे आणि संध्याकाळी पुन्हा राष्ट्रध्वज उरविणे, राष्ट्रध्वज फाटणार नाही किंवा त्याचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

 पालन कसे होणार ?

देशाची लोकसंख्या १३० कोटींपेक्षा अधिक असून, देशभरातील घरांची सर्वसाधारण संख्या १० कोटींच्या आसपास आहे. या सर्व घरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकविण्यासाठी सरकारी यंत्रणांना कसरत करावी लागेल. घरांवर फडकविण्यासाठी १० कोटींपेक्षा अधिक झेंडे पुढील तीन महिन्यांत तयार करावे लागतील. झेंडा किती आकाराचा असावा याची तरतूद झेंडय़ाच्या संहितेत आहे.  झेंडा घरावर फडकविल्यावर त्याचे पावित्र्य जपावे लागते. ध्वज सूर्यास्तानंतर उतरविला पाहिजे, अशी तरतूद ध्वजसंहितेत आहे.

संहितेत काय?

भारतीय ध्वज संहितेमध्ये सन २००६ मध्ये झालेल्या बदलानुसार देशातील कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्थानाही आपल्या घरावर किंवा शाळेत, कार्यालयासमोर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हा राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असावा, प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत असे ध्वजसंहितेमध्ये नमुद करण्यात आले आहे.

अवमान झाल्यास? 

ध्वजसंहितेमध्ये अनेक जाचक तरतुदी असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याबाबत लोकांना कसे समजवायचे तसेच दोनअडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी राष्ट्रध्वज कसे उपलब्ध करायचे अशी अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Centre flag hoisting possibility many difficulties urgency national flag campaign home ysh

Next Story
राणा दाम्पत्याला पुन्हा नोटीस; खारमधील सदनिकेत अनधिकृत बांधकाम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी