मुंबई : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता, मंत्रालय, विधान भवनासह बडय़ा कंपन्यांची कार्यालये, तसेच कामानिमित्त कायम वर्दळ असलेल्या नरिमन पॉइंट, चर्चगेट, कुलाबा परिसरातील काही निवडक रस्ते पाण्याची फवारणी करून स्वच्छ करण्याचा निर्णय पालिकेच्या ए विभाग कार्यालयाने घेतला असून पादचारी, वाहतुकीला अडगळ ठरणारे साहित्य हटवून रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. या कामाला गेल्या आठवडय़ापासून सुरुवात झाली आहे.
ब्रिटिशकाळात मुंबईमधील रस्ते पाण्याने धुण्यात येत होते. त्याच धर्तीवर आता ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नरिमन पॉइंट, चर्चगेट, कुलाबा आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या आणि विशेष रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. येथील काही भागामध्ये मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत असते. परिणामी, आसपासचे रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. दुभाजकांवर, तसेच पदपथांलगतच्या झाडांवरही मोठय़ा प्रमाणावर धुळीचे थर साचलेले असतात. ही बाब लक्षात घेऊन असे काही निवडक रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंत्राच्या साह्याने ही स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानुसार गेल्या बुधवारी रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
वाहनांमधून बाहेर पडणारा धुर, उडणारी धुळ आदींमुळे रस्त्यावरील झेब्राक्रॉसिंग, वाहनांसाठी आखलेली रस्ता रेषा, पदपथालगत आणि दुभाजकांवर केलेल्या रंगरंगोटीवर काजळी जमा होते. रस्ता रेषा अस्पष्ट झाल्यामुळे ती ओलांडणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून कारवाई करणे वाहतूक पोलिसांना अवघड बनते. झेब्राक्रॉसिंग स्पष्ट दिसावे यासाठी तेही पाण्याने स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेदरम्यान रस्ते, पदपथावर अडगळ ठरलेले साहित्यही हटविण्यात येणार आहे. उखडलेले पेव्हर ब्लॉक बसविणे, खड्डे बुजविणे ही कामेही करण्यात येणार आहेत.
रस्ते दुभाजक आणि झेब्राक्रॉसिंगवर काजळी साचते. त्यामुळे नरिमन पॉइंट, चर्चगेट, कुलाबा आदी परिसरातील महत्त्वाचे आणि विशेष रस्त्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. अडगळ बनलेले साहित्य हटवून रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसराच्या सौदर्यात भर पडेल. – शिवदास गुरव, सहाय्यक आयुक्त, ए विभाग कार्यालय