‘‘राजकारणाची चर्चा नेहमीच होत असते, त्याच्या पलीकडले काही विषय हवेत..’’ या लोकेच्छेला पुरेपूर मान देऊन ‘लोकसत्ता’ची संपादकीय आणि ‘विचार’ पाने नेहमीच विविध विषयांना स्थान देत असतात; ती परंपरा यंदाही पाळली जाणार असून तरुण संगणकप्रेमींमध्ये सर्वाधिक कुतूहलाचा विषय असलेला ‘ब्लॉकचेन’, औषध आणि आरोग्य यांच्या जगड्व्याळ व्यवसायामुळे निर्माण झालेले नवे प्रश्न, नद्या प्रवाही राखण्यासाठी त्या वाचविण्याचे आव्हान, लोकस्मृतीत जिवंत राहणारा इतिहास यांसारख्या निराळ्या विषयांना २०२० मध्ये या पानांवर स्थान मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘२०२०’चे खास वेगळेपण म्हणजे महाराष्ट्र-स्थापनेचे हे साठावे वर्ष आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘इंडिया २०२०’ या पुस्तकातून ज्या वर्षीपर्यंत भारताने जागतिक महासत्तांच्या स्पर्धेत उतरण्याचा आराखडा दिला होता, ते हे वर्ष! महासत्तेचे भारतीय स्वप्न हे कुणाशी वैर घेणारे नसून आत्मोन्नतीचे सूत्र त्यामागे आहे.. त्यानुसार आपण किती उन्नती करू शकलो, याचा धांडोळा घेणारे ‘महासत्ता होता होता.. ’ हे तज्ज्ञांचे सदर दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी वाचकभेटीस येणार आहे.

‘लोकसत्ता’च्या नित्य वाचकांना परिचित किंवा अपरिचित असे एकंदर दहा जण (चार लेखक, सहा लेखिका!), नव्याने सुरू होणाऱ्या सात सदरांमधून वाचकांच्या भेटीस येतील. ‘कुतूहल’सह अन्य चार सदरे आणि पाच स्तंभ कायम राहतील, पण नव्या सात सदरांपैकी ‘चतु:सूत्र’ या एकाच सदरातून चार विविध – तरीही आंतरसंबंधित अशा- विषयांवरील चार लेखमाला वर्षभर सुरू ठेवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास यांच्या अभ्यासपूर्ण भानातून ‘लोकसत्ता’च्या वाचकांना दरमहा काही सांगणारे लेख, असे ‘चतु:सूत्र’ चे स्वरूप आहे. ‘चतु:सूत्र’च्या चार सूत्रधारांपैकी श्रद्धा कुंभोजकर इतिहासाच्या प्राध्यापक असल्या तरी लोकस्मृतीत इतिहास कसा जिवंत राहतो आणि का, हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. रूपा रेगे-नित्सुरे यांची अर्थशास्त्रविषयक, तर राजेश्वरी देशपांडे यांची राज्यशास्त्रविषयक लेखमाला ‘लोकसत्ता’च्या वाचकांना आठवत असेल.. परंतु यंदा ‘चतु:सूत्र’च्या सूत्रधार या नात्याने या दोघी, वाचकांना नव्याने विचारप्रवृत्त करण्यासाठी सिद्ध होताहेत. सहसा वृत्तपत्रांतून ऊहापोह न होणाऱ्या समाजशास्त्र या विषयाचे सूत्र सांभाळताहेत या विषयाच्या अनुभवी प्राध्यापक आणि लोकवर्तनाच्या अभ्यासक श्रुती तांबे.

प्रा. उमेश बगाडे यांनी ते शिकवत असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या बाहेरही कित्येक विद्यार्थी तयार केले, तर संजीव चांदोरकर यांनी ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त शिकवताना गेली काही वर्षे लोकांपर्यंत पोहोचणारे लेखन सातत्याने करून वित्त-भांडवलशाही या विषयाबद्दल लोकांचे भान वाढविले. यांपैकी चांदोरकर यांच्या ‘‘अर्था’च्या दशदिशा’ या सदराचे पुनरागमन ‘लोकसत्ता’मध्ये होत आहे, तर प्रा. उमेश बगाडे प्रथमच वृत्तपत्रीय सदरलेखनातून लोकसंवाद साधणार आहेत!

‘ब्लॉकचेन’ या विषयातील तज्ज्ञ, अशी ओळख तरुण वयातच मिळविणारे गौरव सोमवंशी हे ‘साखळीचे स्वातंत्र्य’ या सदरातून दर आठवडय़ास वाचकभेटीला येतील, त्यांचेही वृत्तपत्रीय सदरलेखनात पदार्पण ‘लोकसत्ता’तून होते आहे.

‘आरोग्यक्षेत्राचा धंदा झाला आहे’ अशा कुजबुजीतून औषध कंपन्यांना खलनायकत्व देण्याचा प्रयत्न अनेकदा होत असतो, हे क्षेत्र तर हवेच.. मग नेमके चुकते काय आणि दुखते कुठे, या क्षेत्रात काही चांगलेही घडते आहे ते काय, हे ‘लोकसत्ता’तूनच यापूर्वी ‘औषधभान’ देणाऱ्या डॉ. मंजिरी घरत यंदा नव्या सदरातून सांगणार आहेत. सर्वथैव नवे सदर म्हणजे जल-अभ्यासक परिणीता दांडेकर यांचे ‘नदी-ज्ञान’. या सदरातून ‘नद्या’ या विषयाची सखोल चर्चा होणार आहे.

डॉ. यश वेलणकर यांचे ‘मनोवेध’ हे सदर आज ज्याची चर्चा आहे त्या ‘माइंडफुलनेस’ची दिशा वाचकांना दाखवेल, तसेच चैतन्यप्रेम यांचे अध्यात्मचिंतन यंदाही सुरू राहील. ‘कुतूहल’चा यंदाचा विषय आहे पर्यावरण आणि यंदा या सदराचे समन्वयक आहेत विद्याधर वालावलकर. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुद्दय़ांचे जागतिक माध्यमांत उमटलेले तरंग दाखवून देणारे ‘विश्वाचे वृत्तरंग’ हा स्तंभ कायम राहणार असून महाराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणारे ‘सह्य़ाद्रीचे वारे’ हे सदर एक वर्षांच्या खंडानंतर २०२० मध्ये नव्याने वाचकभेटीस येत आहे. याखेरीज खास इंग्रजी पुस्तकांना वाहिलेले ‘बुकमार्क’ हे विशेष पान, तसेच केंद्र/ राज्यातील सरकार आणि राज्यकर्ते यांची बाजू मांडणारे ‘पहिली बाजू’ हे सदर, धोरणकर्त्यांना अनुभवाचे बोल सुनावणारे ‘समोरच्या बाकावरून’, राजधानी दिल्लीतून देशाचाही वेध घेणारे ‘लालकिल्ला’ ही सदरे २०२० मध्येही असणार आहेत!

विशेष आकर्षण.. : ‘चतु:सूत्र’ या एकाच सदरातून चार विविध – तरीही आंतरसंबंधित अशा- विषयांवरील चार लेखमाला वर्षभर सुरू ठेवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास यांच्या अभ्यासपूर्ण भानातून ‘लोकसत्ता’च्या वाचकांना दरमहा काही सांगणारे लेख, असे ‘चतु:सूत्र’ चे स्वरूप आहे. इतिहास अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर, अर्थविषयक तज्ज्ञ रूपा रेगे-नित्सुरे, राज्यशास्त्र अभ्यासक  राजेश्वरी देशपांडे आणि समाजशास्त्रासह लोकवर्तनाचा अभ्यास करणाऱ्या श्रुती तांबे यांचा ‘चतु:सूत्रा’त समावेश आहे.

संपत्तीकर्त्यांचा ‘बंदा रुपया’

आजवर न पाहिलेले किंवा अनुभवलेले असे वेगळे काही तरी घडविण्याची ऊर्मी अनेकांत असते. महाराष्ट्रासारख्या उद्यमशील आणि उद्योगप्रधान राज्यात तर गावोगावी असे आडवाट चोखाळणारे सापडतील. उपजत प्रेरणा, तंत्रकौशल्य, आवडछंदाचे रूपांतर एखाद्या वळणावर छोटय़ा व्यवसायात होते. भांडवल उभारणीची धास्ती आणि बाजारपेठ मिळण्याची भीती यांवर स्वयंस्फूर्तीने मात करून ही मंडळी व्यवसाय, रोजगार, बाजारपेठेची निर्मिती करतात आणि यशस्वी होतात. यातूनच संपत्तीची निर्मिती होते. संपत्ती निर्माणाविषयीच्या कालबाह्य़ पूर्वग्रहांना झुगारून देणाऱ्या, मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे ‘बंदा रुपया’ हे साप्ताहिक सदर नववर्षांत दर सोमवारी अर्थवृत्तांतमध्ये सुरू होत आहे. स्वतसह अनेकांना रोजगाराच्या संधी देऊन आर्थिक उत्कर्ष साधणाऱ्या संपत्तीकर्त्यांवर आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगशीलतेवर यानिमित्ताने प्रकाशझोत टाकला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Columns of various subjects in the editorial pages of lokasatta in new year abn