इलेक्ट्रिकल अॅण्ड कम्प्युटर, इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल अॅण्ड इन्स्ट्रमेंटल, इलेक्ट्रीकल इन्स्ट्रमेंटेशन अॅण्ड कंट्रोल, मेकॅनिकल अॅण्ड ऑटोमेशन, मॅकॅनिकल प्रोडक्शन, मॅकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स अशा सतराशे साठ गोंडस नावांचे ‘वेष्टन’ अभियांत्रिकीच्या जुन्याच अभ्यासक्रमांना घालून विकण्याचा प्रकार आता थांबणार आहेत. कारण, वेगवेगळ्या नावाचे परंतु सारखेच स्वरूप असलेले अभियांत्रिकीचे विषय बंद करून त्यांच्या परिभाषेत सुसूत्रता आणण्याचा निर्णय तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ (एआयसीटीई) या केंद्रीय नियामक संस्थेने घेतला आहे.
असे सतराशे साठ वेगवेगळ्या नावांचे अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांचा गोंधळ तर उडतोच, परंतु, त्यांच्या पदवीवरील चित्रविचित्र नावांमुळे नोकरी देणाऱ्या कंपन्याही संभ्रमात पडतात. नावांच्या गोंधळामुळे या घडीला देशात किती इलेक्ट्रीकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, याचा धांडोळा घेताना केंद्र सरकारलाही नाकीनऊ येत होते. उदाहरणार्थ एकटय़ा इलेक्ट्रीकल या अभ्यासक्रमाशी साधम्र्य असलेले तब्बल ४२ अभ्यासक्रम आहेत.
‘महाराष्ट्रात अभियांत्रिकी पदव्यांच्या सतराशे साठ नावांमुळे एमपीएससीतही उमेदवारांच्या निवड प्रक्रियेदरम्यान अनेक वाद उद्भवत आहेत. कारण, नावे वेगवेगळी असली तरी अभ्यासक्रम तसा सारखाच असतो. परंतु, नावांमधील बदलांमुळे विद्यार्थ्यांना एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश घेतानाही अडचणी येतात. म्हणून वर्षभरापूर्वी आम्ही या नावांमध्ये सुसूत्रता आणण्याची विनंती एआयसीटीईकडे केली होती,’ असे तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांनी सांगितले. या सूचनांची दखल घेत आता अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये सुसूत्रता आणण्याचे एआयसीटीईने ठरविले आहे. हा गोंधळ आताच दूर नाही केला तर भविष्यात आर्थिक विकासाबाबत नियोजन करताना निश्चितपणे अडचणी येतील, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते.
२३९ पदव्या आणि ३९९ पदविका
भारतात अभियांत्रिकीत मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक अशा काही मुलभूतच शाखा वर्षांनुवर्षे होत्या. १९८०नंतर अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रात खासगी संस्थांना प्रवेश देण्यात आला आणि चित्र पालटले. पण, हे क्षेत्र खासगी संस्थांना जेव्हा खुले झाले तेव्हा अभियांत्रिकीचे मूलभूत विषय केवळ सरकारी संस्थांमध्येच शिकविले जावे, असे तज्ज्ञांचे मत पडले. त्यामुळे, खासगी संस्थांनी प्रस्ताव पाठविताना मूळ विषयांच्या नावांना इतर वेगवेगळी नावे जोडून अभ्यासक्रमासाठी परवानगी मागण्यास सुरूवात केली. पुढे मुलभूत शाखाही खासगी संस्थांना खुल्या झाल्या. परंतु, तोपर्यंत वेगवेगळ्या नावाचे पण, सारखेच स्वरूप असलेले शेकडो अभ्यासक्रम सुरू झाले होते. आता हा गोंधळ इतका वाढला आहे की आताच्या घडीला भारतात अभियांत्रिकीत तब्बल २३९ पदव्या तर ३९९ पदविका अभ्यासक्रम चालविले जात आहेत! ‘आता या सर्व अभ्यासक्रमांचे एकत्रिकरण करण्यात येईल. या प्रक्रियेला वेळ लागेल. परंतु, लवकरच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये सुसूत्रता आणली जाईल,’ असे एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
अभ्यासक्रम एक, नाव अनेक
* ‘इलेक्ट्रीकल’शी साधम्र्य असलेले अभ्यासक्रम – इलेक्ट्रीकल अॅण्ड कम्प्युटर, इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स (सॅण्डविच), इलेक्ट्रिकल अॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रिकल अॅण्ड मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अॅण्ड पॉवर, इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड पॉवर), इलेक्ट्रिकल इंजि. इंडस्ट्रीयल कंट्रोल, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रमेंटेशन अॅण्ड कंट्रोल, इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड पॉवर.
* ‘मेकॅनिकल’शी साधम्र्य असलेले अभ्यासक्रम – मेकॅनिकल अॅण्ड ऑटोमेशन, मेकॅनिकल (इंडस्ट्री इंटिग्रेटेड), मेकॅनिकल(सॅण्डविच), मेकॅनिकल (ऑटो), मेकॅनिकल(प्रोडक्शन), मेकॅनिकल ऑटोमोबाईल, मेकॅनिकल (रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स), मेकॅट्रोनिक्स, मेकॅट्रोनिक्स (सॅण्डविच)