सध्याच्या अस्थिर व स्पर्धेच्या युगात सर्वाचेच दैनंदिन जीवन संघर्षमय असते. अपंगांना तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष व आव्हानांना तोंड द्यावे लागते. एखाद्या अव्यंग किंवा निरोगी व्यक्तीने अपंगाला जीवनाचा साथीदार निवडले किंवा अपंगानेच दुसऱ्याला आयुष्यभरासाठी सोबत द्यायची ठरविली, तर अपंगाचे जीवन फुलू शकते. दमदारपणे उभे राहू शकते. या जीवनसंघर्षांमध्ये अपंगांशी विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या आणि ‘आम आदमी’ला ‘हाता’ची साथ देण्याच्या आणाभाका घेणाऱ्या काँग्रेस  आघाडी सरकारच्या तिजोरीला मात्र हा भार पेलत नाही. करोडो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या सरकारने, अपंगांशी विवाह करणाऱ्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी मदत करण्यास मात्र चक्क नकारघंटा वाजविली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत राज्य, उद्योग, तंत्रज्ञान व अनेक बाबींमध्ये अग्रेसर राज्य असा गौरव राज्यकर्त्यांकडून केला जातो. तळागाळातील जनतेला बरोबर घेऊन त्यांच्या विकासाच्या वल्गना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, अजित पवारांसह अनेक नेतेमंडळींकडून केल्या जातात. काँग्रेसही आम आदमीच्या नावाखाली सामाजिक न्यायाच्या अन्नसुरक्षेसारख्या अनेक योजनांच्या घोषणा करून स्वतची पाठ थोपटून घेते. करोडो रुपयांची उधळपट्टी शासनाच्या सर्व विभागांकडून केली जाते. मंत्रालयात मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी यांची दालने यावर लाखो रुपयांचा खर्च करून तो पुन्हा फुकट घालविला जातो. पण अपंगांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी मात्र निधी देण्यास नकार देण्यात आला आहे.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार ५० हजार रुपये आणि भांडी व अन्य मदत करून संसाराला हातभार लावते. याच धर्तीवर अपंगांशी विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या संसाराला मदत करण्यासाठी सरकारने योजना द्यावी, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे. अपंगांचे साधारणपणे वर्षांला २००-३०० विवाह होतात. त्यामुळे अशी योजना केली, तरी त्याला फारसा निधी लागणार नाही. याबाबत सामाजिक न्याय विभागाने पाठविलेला प्रस्ताव अर्थ खात्याने आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देऊन नाकारला आहे.
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातून आलेल्या अनेक अपंगांनी सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत मंत्रालयात मंगळवारी धडकही मारली होती. करोडो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या सरकारला अपंगांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी पैसे नसल्याने आमदार बच्चू कडू यांनी खेद व्यक्त केला.