|| नीलेश अडसूळ
रस्त्यावरील उकिरडय़ावर चरणारी गाई-गुरे माणसाने टाकलेल्या प्लास्टिकचे बळी ठरत आहेत. मुंबईत गोरेगावमध्ये सापडलेल्या एका गाईच्या पोटात तब्बल ३० किलो प्लास्टिक कचऱ्यासह कंबरेचा पट्टा, बॉल अशा वस्तू आढळून आल्या आहेत.
पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याने २० फेब्रुवारीला ही गाय ताब्यात घेतली. तिच्यावर उपचार सुरू असताना गेल्या महिन्यातच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात गाईच्या पोटात साधारण पस्तीस ते चाळीस किलो प्लास्टिक आणि अन्य अविघटनशील वस्तू आढळून आल्या. गाई, बैल, घोडा, खेचर आदी जनावरे पाळण्यास कायद्याने बंदी आहे. अशी जनावरे आढळून आल्यास पालिका त्यांना ताब्यात घेते. या कारवाईदरम्यान गोरेगावच्या जवाहर नगर येथील व्यक्तीकडून पालिकेने एक गाय ताब्यात घेतली. तिला पालिकेच्या कोंडवाडय़ात आणल्यानंतर महिन्याभरातच गाईने अन्न-पाणी सोडून दिले. वैद्यकीय तपासणीत आतडय़ांना सूज आल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने उपचार सुरू केले. त्या दरम्यान गाईचा मृत्यू झाला. तिचे त्वरित शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिच्या पोटात प्लास्टिक पिशव्यांसह दुधाच्या पिशव्या, बॉल, कंबरेचा पट्टा अशा अनेक वस्तू आढळल्या. उकिरडय़ावर अन्नासोबत इतर कचराही गाईच्या पोटात जात होता. एखाद्या प्राण्याच्या पोटात इतक्या मोठय़ा प्रमाणात कचरा आढळून येण्याचा प्रसंग दुर्मीळ आहे. या प्रकरणानंतर पालिकेने रस्त्यावर आढळून येणाऱ्या जनावरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
घरातील कचरा, खास करून शिळे अन्न सर्रास प्लास्टिकच्या पिशवीत भरून कचराकुंडीत टाकले जाते. बऱ्याचदा हा कचरा कचराकुंडीच्या बाहेरच पडलेला असतो. असे उकिरडे मुंबईत रस्त्यारस्त्यांवर पाहायला मिळतात. अन्नाच्या शोधात असलेली भटकी किंवा मालकाने सोडून दिलेली जनावरे अशा ठिकाणी जाऊन टाकाऊ अन्नपदार्थासोबतच मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचे सेवन करतात. यामुळे जनावरांच्या आतडय़ांवर परिणाम होऊन जिवाला धोका निर्माण होतो. गुरेमालकांवर आम्ही कारवाई करीत आहोतच; परंतु नागरिकांनी पर्यावरणाचे भान बाळगून प्लास्टिकचा वापर टाळायला हवा, असे आवाहन पालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. योगेश शेटे यांनी केले.
गाईंच्या जबडय़ाच्या रचनेमुळे त्या काय खात आहेत, हे त्यांना कळत नाही. त्यांना वरचे दात नसतात आणि ओठही कमी संवेदनशील असतात. त्यामुळे चाऱ्यापासून प्लास्टिकच्या पिशव्यांपर्यंत गाई काहीही खातात. प्लास्टिकचे पचन होत नसल्याने ते पोटात साठून राहते आणि पचनसंस्थेमध्ये अडचणी येतात.
मुंबईसारख्या शहरांत कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांखेरीज इतर जनावरे पाळण्यास बंदी आहे. अशी जनावरे पालिकेला ताब्यात घेता येतात; परंतु मुंबईत या नियमाची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने रस्त्यावर जनावरे फिरताना आढळतात. भटक्या गाईंचा प्रश्न गुजरातमधील बडोदा शहरात तीव्र झाल्याने गाईच्या मालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.