माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर आपल्या मर्जीतील आयुक्त असावा, असा विशिष्ट आयपीएस लॉबीचा प्रयत्न फसल्यानंतर पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत गुन्हे अन्वेषण विभागाचा सहआयुक्त मर्जीतील असावा, असा आग्रह संबंधित लॉबीने धरला होता. परंतु राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अभिताभ रंजन यांनी याबाबत स्पष्टीकरण मागवत हा डावही यशस्वी होऊ दिला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतरच गेले नऊ महिने रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांचे प्रस्ताव हलण्यास सुरुवात झाली. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण असावे, हे विशिष्ट आयपीएस लॉबीच ठरवत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. राज्याला सहा महासंचालकांची पदे निर्माण करण्यास केंद्राकडून परवानगी मिळालेली आहे. मात्र सध्या राज्यात पोलीस प्रमुखासह लाचलुचपत विभाग, पोलीस गृहनिर्माण मंडळ, गृहरक्षक दल आणि सुरक्षा अशी महासंचालकांची पाच पदे आहेत. परंतु यानुसार नियुक्त्या झाल्या तर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला मुंबईच्या आयुक्तपदी बसविता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर या लॉबीने अरूप पटनाईक यांच्यासाठी निर्माण केलेले महासंचालकांचे पद अतिरिक्त महासंचालक करण्याचा प्रस्ताव सादर केला. परंतु हा प्रस्ताव गृहखात्याने मंजूर केला नाही. त्यातच डॉ. सिंग यांनी राजीनामा दिल्यामुळे महासंचालकपदाचे आणखी एक पद रिक्त झाल्यानंतर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर या लॉबीने सहआयुक्तपदासाठी मर्जीतील अधिकाऱ्यासाठी प्रयत्न सुरू केले.
नव्या पोलीस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ रंजन यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांच्या पदासाठी तीन नावांची शिफारस तसेच दोन अतिरिक्त महासंचालकांची बढती आदी झाल्यानंतर सहआयुक्त (गुन्हे) या पदासाठी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याचे नाव पुढे दामटण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्याने गुन्हे अन्वेषण विभागात सहा वर्षे घालविली होती. त्याची बदली होऊन फक्त काही महिने झालेले असताना पुन्हा या नावाचा अट्टहास का, असा सवाल रंजन यांनीच उपस्थित केला.
मात्र त्याला समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकलेल्या संबंधित लॉबीतील अधिकाऱ्याने अखेर आपला हट्ट मागे घेतला. त्यानंतर सहआयुक्तपदासाठी अन्य नावाची शिफारस केली गेली, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2014 रोजी प्रकाशित
गुन्हे विभागात मर्जीतील सहआयुक्त नेमण्याचा अट्टहास फसला!
माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर आपल्या मर्जीतील आयुक्त असावा, असा विशिष्ट आयपीएस लॉबीचा प्रयत्न फसल्यानंतर पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत गुन्हे अन्वेषण विभागाचा सहआयुक्त मर्जीतील असावा,
First published on: 15-02-2014 at 01:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime department commissioner appointment conflict