मुंबई : सायबर फिशिंग करणाऱ्या टोळय़ा दरवेळी नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. सध्या थकीत वीज बिलांच्या माध्यमातून ग्राहकांना लक्ष्य करण्यात येत आहे. पवई येथे राहाणाऱ्या ६३ वर्षीय महिला वीज बिल भरण्याचा संदेश पाठवून अडीच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यासाठी त्याने एका अ‍ॅप्लिकेशनचा वापर केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी घाटकोपर येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे संदेश सध्या अनेक नागरिकांना येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार महिला व्यवसायाने वकील आहे. १६ मेला त्या कामानिमित्त वांद्रे येथे जात असताना त्यांच्या मोबाइलवर एक संदेश आला. या संदेशात त्याचे थकीत वीज बिल भरावे लागणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. काही वेळाने त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण खासगी विद्युतपुरवठा कंपनीतील कर्मचारी असल्याचे सांगून वीज बिलाची माहिती अद्ययावत करण्यासाठी ११ रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यासाठी गूगल प्लेवर जाऊन ‘एनी डेस्क’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सूचना त्याने तक्रारदारांना केली. त्यानंतर ‘एनी डेस्क’ डाऊनलोड करून तक्रारदार महिलेने त्यांच्या डेबिट कार्डद्वारे ११ रुपये ऑनलाइन भरले. त्यानंतर तक्रारदार महिलेला त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याचे चार संदेश प्राप्त झाले. त्याद्वारे अनुक्रमे ५९ हजार, ५९ हजार ५००, ६० हजार व ६० हजार रुपयांचे व्यवहार त्यांच्या बँक खात्याद्वारे करण्यात आले.  तक्रारदार महिलेने तात्काळ बँकेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कार्ड बंद करण्यास सांगितले. पण त्यापूर्वी या महिलेच्या बँक खात्यातून दोन लाख ३८ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber hackers targets power consumer zws
First published on: 27-05-2022 at 01:51 IST