उपनगरी रेल्वेच्या हद्दीतील विद्युत यंत्रणा कमी-अधिक दाबाच्या विद्युत भाराची असून त्यासाठी लागणाऱ्या गाडय़ांची संख्या कमी असल्यामुळे रेट्रोफिटेड गाडय़ांचा वापर अपरिहार्य ठरत असल्या तरी या गाडय़ांच्या वापरामुळे रेल्वे प्रवास धोकादायक झाला आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये सध्या १४ रेट्रोफिटेड गाडय़ा आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विद्युत यंत्रणेमध्ये बदल करण्यात आला असून आता प्रत्येक गाडीला २५ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह आवश्यक असतो. मात्र अद्याप मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे इतक्या विद्युत भारामध्ये रूपांतरण झालेले नाही. त्यामुळे अनेक भागात १५०० व्होल्ट तर काही भागात २५ हजार व्होल्ट इतका विद्युत प्रवाह असतो. पश्चिम रेल्वेवरील बहुतांश भाग हा नव्या विद्युतभारावर रूपांतरीत झाला आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा, कल्याण ते पुणे दरम्यान नव्या २५ हजार व्होल्टच्या प्रवाहावर गाडय़ा चालविण्यात येतात.
पश्चिम रेल्वेकडून आणि मुंबई रेल विकास महामंडळाकडून दोन्ही यंत्रणावर चालणाऱ्या गाडय़ा उपलब्ध होईपर्यंत पर्याय म्हणून या गाडय़ा वापरात आल्या. गाडय़ांमधील विद्युत यंत्रणा काढून त्यामध्ये दोन्ही यंत्रणेवर चालू शकेल असे बदल करून चांगल्या अवस्थेतील डब्यांमध्ये ती बसवली जाते. अशा प्रकारच्या गाडय़ांमध्ये कधीही तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोटरमनसोबत एक तांत्रिक विभागाचा कर्मचारीही प्रवास करत असतो. मात्र या गाडय़ा पूर्णपणे निर्धोक प्रवासी वाहतूक करू शकतात याबद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्येच दुमत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडय़ांचा वापर अनिवार्य ठरत असला तरी या गाडय़ांमधून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.
दोन्ही यंत्रणेवर गाडी चालत असताना अनेकदा गाडीच्या पेंटोग्राफ असलेल्या डब्यातील ‘व्हॅक्युम सर्किट ब्रेकर’ (एका विद्युत भारातून दुसऱ्या विद्युत भारामध्ये जाणारी यंत्रणा) नादुरुस्त होऊन पेंटोग्राफमध्ये दोष निर्माण होतो.
परिणामी गाडी बंद पडू शकते. अशावेळी व्हीसीबी मधील दोष दूर न करता पेंटोग्राफ दुरूस्त करण्याचा प्रयत्न झाला तर गाडीमध्ये अन्य बिघाड निर्माण होऊ शकतात. हे दोष कधीकधी धोकादायक होऊ शकतात.