कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम व त्याच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांबाबत याआधी झालेल्या लिलावातून मिळालेल्या मालमत्तेचा अद्याप ताबा मिळालेला नसतानाही त्याच्या आणखी काही मालमत्तांचा बुधवारी लिलाव झाला. माजी ज्येष्ठ पत्रकार, व्यावसायिक आणि धार्मिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याने बोली लावत दाऊदच्या मालमत्तांवर आपले नाव नोंदले. तब्बल ७ मालमत्तांसाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. यापैकी पहिल्या तीन मालमत्ता दाऊदच्या होत्या. उर्वरित मालमत्ता बेनामी म्हणून लिलावात काढण्यात आल्या. कडेकोट पोलीस बंदोबस्तात हा लिलाव झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकमोडिया स्ट्रीटवरील पूर्वाश्रमीचे हॉटेल रौनक अफरोझ (काही काळापुरते दिल्ली झायका) हे लिलावात १ कोटी १८ लाखांना उपलब्ध होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहत असलेल्या डांबरवाला इमारतीपासून ते काही अंतरावर आहे. या मालमत्तेसाठी माजी ज्येष्ठ पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली तर दाऊद बोहरा ट्रस्टने या मालमत्तेसाठी ४ कोटी पाच लाख देऊ केले. परंतु बालकृष्णन यांनी त्यांच्या देशसेवा समितीमार्फत चार कोटी २८ लाखांची बोली लावली. अखेर ते या मालमत्तेचे मालक झाले. या लिलावात आणखी चारजणांनी भाग घेतला. रौनक अफरोझ या हॉटेलला प्राप्तीकर विभागाने सील ठोकल्यानंतरही त्यात घुसखोरी करून दिल्ली झायकासाठी हे हॉटेल भाडयाने देण्यात आले होते. परंतु ही बाब प्राप्तीकर विभागाला समजल्यानंतर त्यांनी पुन्हा ही मालमत्ता ताब्यात घेतली होती. या मालमत्तेला बोली लावल्याबद्दल छोटा शकील याने धमकी दिल्याची तक्रार बालकृष्णन यांनी केली होती.
दाऊद कुटुंबीयांच्या मालकीची हुंदई अ‍ॅसेन्ट (एमएच ०४ एएक्स ३६७६) या गाडीची लिलावातील किंमत १५ हजार ७०० रुपये होती. घाटकोपर येथील एका सरकारी वसाहतीत उभ्या करून ठेवण्यात आलेल्या या गाडीचे टायर तसेच काचा फुटलेल्या स्थितीत आहेत. परंतु तरीही या गाडीसाठी हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी ३२ हजारांची बोली लावली. दाऊदला धडा शिकविण्यासाठी आपण ही गाडी लिलावात विकत घेतल्याचे चक्रपाणी यांनी सांगितले. दमण येथील तीन गुंठा शेतजमिनीसाठी राखीव किंमत दीड लाख रुपये ठेवण्यात आली होती. गुजरातमधील मुकेश शहा या व्यावसायिकाची आठ लाख रुपयांची बोली सरस ठरली. या लिलावात तीनजणांनी भाग घेतला. उर्वरित चार मालमत्तांमध्ये आठजणांनी बोली लावली. या मालमत्ता मालमत्ता जयदीप ढोलसानिया, राजबहाद्दूर शर्मा यांनी विकत घेतल्या.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood property auction