विरार येथे शनिवारी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आज (सोमवार) पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. तीन दिवसात गोळीबाराची दुसरी घटना घडल्याने वसई विरार शहरात खळबळ उडाली आहे.

विरार पूर्वेच्या बरफ पाडा येथे आसाराम राठोड (४२) या कंत्राटदारावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला, या हल्ल्यात कंत्राटदार राठोड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विरारच्या संजीवनी या खासगी रुग्णालयात उपचारात सुरू आहेत.

शनिवारी विरार मध्ये राहणाऱ्या समय चौहान या तरुणाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, राठोड यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.