मुंबई : औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या (ड्रग रेसिस्टंट) उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ‘कॅनामायसिन’ नावाच्या इंजेक्शनचे रुग्णांवर गंभीर दुष्परिणाम जाणवत असल्याची तक्रार असल्यामुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधून हे औषध काढून टाकावे, अशी मागणी या क्षेत्रात कार्यरत देशभरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. यात मुंबईतील काही संस्थाचाही समावेश आहे.

करोनाकाळात क्षयरोगावरील औषधांचा वापर कमी प्रमाणात झाला आहे. ही औषधे केंद्रीय आरोग्य विभागामार्फत खरेदी केली जात असून यांची मुदत संपण्याआधी वापर होणे गरजेचे आहे. ‘कॅनामायसिन’ इंजेक्शनच्या सुमारे ५४ लाख कुप्या शिल्लक आहेत. या औषधांचा वापर वेळेत होणे गरजेचे असल्यामुळे यांचा जास्तीत जास्त वापर केला जावा, अशी सूचना केंद्रीय क्षयरोग विभागाचे उप महासंचालक डॉ. राजेंद्र जोशी यांनी पत्राद्वारे सर्व राज्यांच्या क्षयरोग विभागांना केली आहे. वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये, केंद्रीय निधी देण्यात येणारी रुग्णालये, एम्स, रेल्वे आणि संरक्षण खात्याची रुग्णालये येथे ही औषधे मोफत उपलब्ध केली जाणार आहेत.

सामाजिक संस्थांच्या म्हणण्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग उपचार मार्गदर्शक तत्त्वामध्ये ‘कॅनामायसिन’चा वापर करण्याबाबत कोणत्याही सूचना  नाहीत. इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांऐवजी तोंडाद्वारे दिली जाणारी ‘बेडाक्युलीन’ आणि ‘डेलामनाईड’ या नवीन औषधांच्या वापरावर भर द्यावा. ‘रिफॅम्पिसिन’ या औषधाला दाद न देणाऱ्या आणि मल्टी ड्रग रेसिस्टंट क्षयरोगावर ही औषधे अधिक सुरक्षित आहेत, पण    भारतामध्ये त्यांचा  पुरेसा साठा नाही.

नसल्यामुळे इंजेक्शनवरच भर दिला जात आहे.

‘कॅनामायसिन’ इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांमध्ये बहिरेपणा येणे, मूत्रिपडावर परिणाम होणे इत्यादी गंभीर दुष्परिणाम होत आहेत. एमडीआर क्षयरोगाच्या रुग्णांना जवळपास १८ महिन्यांहून अधिक काळ उपचार घ्यावे लागतात. त्यात अशा प्रकारच्या औषधांमुळे रुग्णाला विनाकारण बराच काळ वेदना आणि अपंगत्वाचा धोका पत्करावा करावा लागत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर उपचारामध्ये पूर्णत: थांबविण्याची मागणी केंद्रीय क्षयरोग विभागाला क्षयरुग्ण, बरे झालेले रुग्ण, सामाजिक संस्थांनी केली आहे. यामध्ये ‘कॅनामायसिन’ इंजेक्शनमुळे बहिरेपणा आलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये, केंद्रीय निधी दिली जाणारी रुग्णालये, एम्स, रेल्वे आणि संरक्षण खात्याची रुग्णालये येथे मोफत उपलब्ध केल्या जाणाऱ्या औषधांमधून ‘कॅनामायसिन’ काढून टाकावे, या औषधाचा वापर उपचारामध्ये तातडीने थांबविण्याच्या सूचना राज्यांना देऊन उपचार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करावा आणि ‘कॅनामायसिन’चा उपलब्ध साठा अन्य आजारांसाठी वापरावा, असे या मागणीपत्रामध्ये स्पष्ट केले आहे.  एक्सडीआर क्षयरोग झालेल्या किंवा होण्याच्या टप्प्यांवर असलेल्या रुग्णांसाठी ‘बेडाक्युलीन’ आणि ‘डेलामनाईड’ ही औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.