|| इंद्रायणी नार्वेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्निशमन दलात नवीन यंत्रणा

मुंबई : पूर्व उपनगरांत थोड्या थोड्या कालावधीने होणारी वायुगळती किंवा विचित्र दुर्गंधीचा शोध घेण्यासाठी पालिका आता नवीन तंत्रज्ञान अग्निशमन दलात आणणार आहे. दूषित भागातील हवा विशिष्ट फुग्यात भरून त्याची तपासणी केली जाईल. पूर्व उपनगरांतील सर्व रासायनिक कंपन्यांनाही हे तंत्रज्ञान घेण्याच्या सूचना पालिकेतर्फे दिल्या जाणार आहेत.

गेल्या आठवड्यात पूर्व उपनगरांत गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी आणि पवई या भागांत दुपारी अचानक विचित्र दुर्गंधी येऊ लागली आणि वायुगळतीच्या संशयामुळे नागरिक भयभीत झाले. तब्बल चार तासांनी ही दुर्गंधी येणे बंद झाले. मात्र ही दुर्गंधी नक्की कुठून येत होती आणि कशाची होती याचा नेहमीप्रमाणे उलगडा झालाच नाही. गेल्या वर्षभरात अशा घटना वाढल्या असून त्याचे गूढही वाढले आहे. कधीही अचानक येणा ऱ्या या दुर्गंधीमुळे आतापर्यंत जीवितहानी झालेली नसली या भागात राहणा ऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वारंवार होणा ऱ्या या घटनांची पालिकेने आता गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशी वायुगळती किंवा विचित्र दुर्गंधी येण्याच्या घटना घडल्यास काय करायचे याकरिता पालिकेने आता निश्चिात कार्यपद्धती आखण्यास सुरुवात केली आहे.

पूर्व उपनगरांत बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ अशा अनेक रासायनिक कंपन्या आहेत. तसेच महानगर गॅस लिमिटेडच्या गॅसवाहिन्यांचेही जाळे मुंबईभर आहे. त्यामुळे व्यापक परिसरात दुर्गंधी येऊ लागली की साहजिकच कंपन्यांमधून वायुगळती होते की काय, अशी भीती निर्माण होते. त्यामुळे गेल्या वर्षी पालिकेने मुंबईतील अशा रासायनिक कंपन्यांच्या प्रतिनिधींची व वायू प्रदूषणावर काम करणा ऱ्या संस्था आणि मुंबई महापालिका, अग्निशमन दल अशा १६ विविध प्राधिकरणांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची लवकरच बैठक घेऊन निश्चित कार्यपद्धती ठरवण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

फुग्याचे तंत्रज्ञान काय आहे?

ज्या भागात अशी दुर्गंधी येत असेल, तेथील दूषित हवा विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने एका खास फुग्यात भरली जाते. या फुग्यातील हवेचे नंतर परीक्षण करून त्यात कोणत्या वायूचे किती प्रमाण आहे, कोणत्या वायूचे प्रमाण वाढले आहे का हे तपासून पाहता येते. हे तंत्रज्ञान लवकरच अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘बलून तंत्रज्ञान’ हे सिद्ध झालेले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांतील सर्व रासायनिक कंपन्यांनीही हे तंत्रज्ञान स्वत:जवळ ठेवावे, अशा सूचना दिल्या जाणार आहेत. – सुरेश काकाणी,  अतिरिक्त आयुक्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Detect air leaks balloon technology akp