भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधान परिषदेचे सदस्य असलेल्या मुंडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते मंगळवारी आमदारकीचा राजीनामा देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर मंगळवारी दुपारी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकीट दिल्यास गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे यांच्याविरोधातही लढण्याची आपली तयारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून धनंजय मुंडेविरुद्ध गोपीनाथ मुंडे असा वाद बीड जिल्ह्यामध्ये चर्चिला जात आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात बहुचर्चित व लक्षवेधी ठरलेल्या सिरसाळा गणात भाजपचा उमेदवार १ हजार ४०० मतांनी विजयी झाला असताना १६ महिन्यांनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र २०० मतांनी भाजपला पराभव पत्करावा लागला. गोपीनाथ मुंडे यांना एकगठ्ठा मते देणाऱ्या गावातही आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीला मतांची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्यांदाच खासदार मुंडेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा चंचुप्रवेश झाला. त्यामुळे धनंजय मुडे चर्चेत आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde resigns from mlc