रामदास कामत, राधाकृष्ण नार्वेकर, विजय फळणीकर आणि सहा जणांचा समावेश
दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री नवरत्न’ पुरस्कारांची घोषणा बुधवारी मुंबईत दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केली. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवार, १२ मे रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून पुरस्काराचे यंदा १५वे वर्ष आहे.
विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या महाराष्ट्रातील मान्यवरांना ‘सह्य़ाद्री नवरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या मानकऱ्यांमध्ये ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष (साहित्यरत्न), ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत (नाटय़रत्न), संगीतकार अजय-अतुल (संगीतरत्न), अभिनेते नाना पाटेकर (चित्ररत्न), लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजया वाड (शिक्षणरत्न), ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (रत्नदर्पण), उद्योजक अनिल जैन (वैभवरत्न), सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर (सेवारत्न), ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव (कलारत्न) यांचा समावेश आहे. अभिनय क्षेत्रातील पदार्पणासाठीचा ‘फेस ऑफ द इअर’ हा पुरस्कार अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना जाहीर झाला आहे.
गिरिजा काटदरे, विजय कलंत्री, विक्रम गोखले, दिनकर रायकर यांच्या निवड समितीने या ‘नवरत्नां’ची निवड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doordarshan sahyadri navratna awards