पर्यटक म्हणून मुंबईत आलेल्या एका फ्रेंच महिलेवर एका गर्दुल्ल्याने हल्ला केला. गुरुवारी संध्याकाळी न्यू एक्सलसियर सिनेमागृहाजवळ ही घटना घडली. गस्तीवरील पोलिसांनी या गर्दुल्ल्याला अटक केली. कॅरोलिन क्लॉडन (५४) ही फ्रेंच महिला पर्यटक म्हणून मुंबईत आली होती. गुरुवारी संध्याकाळी न्यू एक्सलसियर सिनेमागृहाजवळील वॉलेस रोडवरून ही महिला जात होती. त्यावेळी सैफूल बाकोची (२५) हा तरुण तिच्याजवळ आला. ‘मै तुमसे प्यार करता हू’ असे बडबडत त्याने तिला ठोसा लगावला. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी आझाद मैदान पोलिसांची मोबाईल व्हॅन गस्तीवर होती. पोलिसांनी लगेच सैफूलला अटक केली. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या कॅरॉलिन हिच्यावर जी. टी. रुग्णालयात उपचार करण्यात आले. परदेशी नागरिक, विशेषत: महिला भारतात आलेल्या मला आवडत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे.