मुंबई : सुट्ट्या पैशांवरून बसवाहक आणि प्रवाशांमधील वाद संपुष्टात यावा, प्रवाशांना झटपट तिकीट मिळावे या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने ‘चलो कार्ड’ योजनेची अंमलबाजवणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘चलो कार्ड’ मिळेनासे झाले आहे. प्रवासी वारंवार वाहकांकडे या कार्डची मागणी करीत आहेत. पुरवठाच होत नसल्याने प्रवाशांना कार्ड उपलब्ध करण्यास वाहक असमर्थ ठरत आहेत. मात्र यासंदर्भात बेस्ट उपक्रमाने मौन घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी बेस्ट बसचा प्रवास अधिक आरामदायी करण्याच्या हेतूने फेब्रुवारी २०२२ साली ‘चलो कार्ड’ योजना सुरू केली. या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आजतागायत बेस्ट उपक्रमातर्फे ९ लाख ७५ हजार ‘चलो कार्ड’ प्रवाशांना वितरीत केली आहेत. दररोज ३३ ते ३५ लाख प्रवासी बेस्ट बसमधून प्रवास करतात. बसमधील गर्दी, सुट्ट्या पैशांचा प्रश्न आदी विविध कारणांमुळे प्रवासी आणि बस वाहकांमध्ये वारंवार खटके उडत होते. ही बाब लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ‘चलो कार्ड’ योजना आखली. या योजनेची मोठ्या धूमधडाक्यात अंमलबजावणीही केली. प्रवाशांनीही या योजनेला भरभरून पाठिंबा दिला. ‘मुंबई चलो कार्ड’ या संकेतस्थळावरून १८ टक्के वस्तू आणि सेवा करासह ७० रुपयांत हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने मागवता येत होते. यात वाहतूक खर्चदेखील आकारला जात होता. ‘चलो कार्ड’ घेण्यासाठी प्रवाशांना आगारात जावे लागू नये म्हणून उपक्रमाने ते वाहकांना उपलब्ध केले. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहकांकडून अवघ्या ५० रुपयांमध्ये हे कार्ड मिळू लागले. तसेच वाहकाकडूनच या कार्डमध्ये पैसे भरण्याची सुविधाही प्रवाशांना उपलब्ध झाली. यामुळे या कार्डला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे.

हेही वाचा – “…तर १०,००० कोटी रुपये वाचले असते”, मेट्रो कार डेपोच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप

कार्डात भरलेल्या रकमेच्या वापरासाठी समाप्ती कालावधी नाही. त्यामुळे ते हवा तेवढा काळ कार्ड वापरता येते. चलो कार्ड धारकांसाठी बेस्ट उपक्रम तिकिटांच्या दरामध्ये आकर्षक सवलतही देण्यात आली आहे. सहा रुपये तिकीट दरानुसार, बसच्या ५० फेऱ्यांसाठी ३०० रुपये आकारले जातात. मात्र, चलो कार्ड धारकांना केवळ २२० रुपयांत ५० फेऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून ‘चलो कार्ड’ला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र अचानक ‘चलो कार्ड’चा तुटवडा निर्माण झाला असून प्रवाशांना ‘चलो कार्ड’ मिळेनासे झाले आहे. वाहकांकडे शिल्लक असलेली ‘चलो कार्ड’ बेस्टच्या कार्यलयात जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे वाहकांनी सूचनेचे पालन करीत ही कार्ड कार्यालयात जमा केली. मात्र प्रवाशांकडून वारंवार ‘चलो कार्ड’साठी मागणी होत आहे. ‘चलो कार्ड’ केव्हा वितरित करणार, असा प्रश्न प्रवासी वारंवार वाहकांना विचारत आहेत. पण वाहकांकडे त्याचे उत्तर नाही.

हेही वाचा – मुंबई : चेंबूरमधील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

वाहकांकडील सुट्ट्या पैशांचा भार कमी करण्यासाठी, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाने यापूर्वीही दोन ॲप सेवेत आणली होती. मात्र, काही कालावधीतच ती ॲप बंद झाली. त्यामुळे ‘चलो ॲप’ही बंद होईल का अशी चर्चा बेस्ट बसमध्ये रंगू लागली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to shortage of chalo card of best passengers are inconvenienced but the officials of the initiative are silent mumbai print news ssb