सुमारे दीड हजार मेगावॅटचा तुटवडा; महागडय़ा वीजखरेदीसाठीच कोयनेचा बेसुमार वापर?
अनेक वीजनिर्मिती संच बंद पडल्याने, कोयना येथील वीजनिर्मिती थांबविल्याने आणि महागडी वीज खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचण असल्याने राज्यात गेले चार दिवस मोठय़ा प्रमाणावर वीज भारनियमन होत आहे. सुमारे ७०० मेगावॉट अतिरिक्त वीज उपलब्ध झाल्याने शुक्रवारी सकाळी सुमारे दीड हजार मेगावॉटचे भारनियमन करावे लागले, असे महावितरणकडून सांगण्यात आले. कोयना प्रकल्पाचा वापर उन्हाळ्यात करण्यासाठी नियोजन करुन पाणी राखून न ठेवण्यामागे महागडी वीजखरेदी करता यावी, हे कारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
राज्यात उन्हाळ्यामुळे आणि कृषीसाठी पाण्याची उपलब्धता असल्याने महावितरणची वीजेची मागणी १८ ते १८ हजार ५०० मेगावॉटवर पोचली आहे. त्यातच कोराडी, परळी, अदानी, रतन इंडिया, खापरखेडा आदी ठिकाणचे सुमारे तीन हजार मेगावॉटचे वीजनिर्मिती संच बंद पडल्याने गेल्या चार दिवसात मोठय़ा प्रमाणावर भारनियमन करावे लागले. देशातच वीजेच्या मागणीत वाढ आणि उपलब्धता कमी झाल्याने खासगी खरेदी प्रक्रियेतून (एक्सेंज) मिळणारी वीज पावणे तीन रुपये प्रति युनिटवरुन पाच ते साडेपाच रुपये प्रति युनिटवर पोचली आहे. महावितरणची आर्थिक अडचण असल्याने महागडी वीजखरेदी बंद असल्याने चार हजार मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाला होता. आता काही संच सुरु होत असून अन्य ७०० मेगावॉट वीज उपलब्ध झाल्याने शुक्रवारी दिवसभरात दीड हजार मेगावॉटचे भारनियमन करावे लागले, असे महावितरणकडून सांगण्यात आले. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोयना धरणातून राज्याच्या वाटय़ाला ६७ टीएमसी पाणी मिळते आणि उन्हाळ्यात वीजनिर्मितीसाठी ते उपलब्ध व्हावे, यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कोयनाचा वापर फारसा केला जात नाही. पण गेल्या काही महिन्यात कोयना धरणातून बेसुमार पाणीवापर करुन वीजनिर्मिती करण्यात आली. या कालावधीत खासगी वीज पावणेतीन रुपये प्रतियुनिट दराने उपलब्ध असताना कोयनातील वीज एक ते सव्वा रुपये प्रति युनिटने मिळते, यासाठी वापरली गेली. मात्र उन्हाळ्यासाठी पाणी न राखल्याने पावणेतीन रुपयांऐवजी आता पाच ते साडेपाच रुपये प्रति युनिट दराने महागडी वीज खरेदी करण्याची वेळ आता महावितरणवर आली आहे.
- भारनियमनाचे चटके बसायला लागल्यावर ओरड होते आणि महागडी खासगी वीजखरेदी करण्याच्या सूचना दिल्या जातात. हे ओळखून जाणीवपूर्वक कोयनाचा बेसुमार वापर झाला असावा, असे सूत्रांनी सांगितले.