दिनेश गुणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीडच्या ‘शांतिवना’त दुष्काळविरोधी ‘अन्नयज्ञ’ ; छावण्यांमध्ये पाच हजार व्यवस्था

मराठवाडय़ातील दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्रातील संवेदनशील मने होरपळून निघाली. चारापाण्याला मोताद झालेल्या जनावरांच्या काळजीने माणुसकीला पाझर फुटला, आणि त्यातूनच उभा राहिला, एक ‘अन्नयज्ञ’! जनावरांच्या काळजीपोटी स्वतला जनावरांसोबत छावणीतच डांबून घेत तेथेच बाडबिस्तरा मांडणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बीड येथील ‘शांतिवन’ या संस्थेने पुढाकार घेतला आणि असंख्य चाहत्यांचे मदतीचे हातही पुढे झाले.

आता बीड परिसरातील छावण्यांमध्ये मुक्काम करणाऱ्या पाच हजार शेतकऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची जबाबदारी शांतिवनने घेतली आहे. जनावरांना जगविण्यासाठी स्वत उपासमार सोसणाऱ्या शेतकऱ्यांकरिता दररोज रात्री या छावण्यांमध्ये हा अन्नयज्ञ चालतो..

तीव्र दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्य़ात आपल्या लाखमोलाच्या जनावरांना चारापाण्यासाठी छावणीमध्ये दाखल करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.  या शेतकऱ्यांची गावे छावणीपासून बरीच दूर.. त्यामुळे एका गावात राहणारे शेतकरी एकत्र आले, आणि गावाकडच्या आपल्या घरातून भाजी-भाकरी बांधून आणण्याची जबाबदारी त्यांनी उचलली.

पण तीव्र उन्हाळ्यामुळे दुपारच्या जेवणानंतर भाकऱ्या कडकडीत होऊन जायच्या, तर कधी भाजी नासून जायची. मग रात्रीच्या जेवणावर फुली मारून उपाशीपोटी झोपण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ लागली. गावाकडे मालदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांवर उपाशी झोपण्याची वेळ ओढवल्याचे पाहून शांतिवनाच्या कार्यकर्त्यांची माणुसकी जागी झाली. ६०० छावण्यांमधील जनावरांना जगविण्यासाठी स्वत उपासमार सोसणाऱ्या या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी शांतिवनात शेतकऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. सध्या दहा छावण्यांतील पाच हजार शेतकऱ्यांकरिता रात्रीच्या जेवणाची सोय शांतिवनच्या कार्यकर्त्यांनी केली असली, तर अन्य छावण्यांमध्ये जनावरांसाठी उपासमार सोसणाऱ्या शेतकऱ्यांकरिताही अशी सोय सुरू करण्याची शांतिवनाची तयारी आहे. समाजातील दानशूरांच्या सहभागाने हा अन्नयज्ञ सफल करता येईल, असा शांतिवनचे प्रमुख दीपक नागरगोजे यांचा विश्वास आहे.

बीड जिल्ह्यात विविध चारा छावण्यांमध्ये सुमारे एक लाख जनावरे आश्रयाला आली आहेत.  एका जनावरासाठी नव्वद रुपये अनुदान दिले जात असल्याने, जनावरांच्या चारापाण्याची काहीशी सोय झाली, पण गावापासून दूर, दहापंधरा किलोमीटर अंतरावरच्या छावणीत जनावरांसोबत राहणाऱ्या माणसांसाठी मात्र अशी कोणतीच तरतूद नाही. अनेक शेतकरी आपली दोनपेक्षा जास्त जनावरे घेऊन छावण्यांमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची देखभाल या शेतकऱ्यांनाच करावी लागते. वीसपंचवीस एकर जमीन, लाख रुपये किंमतीची जनावरे, उमद्या बैलजोडय़ा असलेल्या शेतकऱ्यांवरही रात्री उपाशीपोटी झोपण्याची वेळ ओढवली आहे, असे दीपक नागरगोजे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्यासाठी दीपक नागरगोजे, सुरेश जोशी, उज्ज्वला बागवडे, नरेंद्र मेस्त्री, आदी कार्यकर्त्यांनी कंबर कसली, आणि शरिुर, पाटोदा, आणि बीड या तीन तालुक्यांतील दहा छावण्यांमधील पाच हजार शेतकऱ्यांकरिता रात्रीचे जेवण सुरू केले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, कडधान्ये व भात असा आहार वैद्यकीय सल्ल्यानुसार दिला जातो, आणि आठवडय़ातून एकदा सकस आहार दिला जातो, असे नागरगोजे यांनी सांगितले. माणुसकीच्या या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९९२३७७२६९४ या क्रमांकावर संपर्क साधावा व दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सामूहिक शक्ती पणाला लावावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers hunger to save the animals