बोरिवलीत एका रहिवाशी इमारतीमध्ये भीषण आग लागली होती. गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

“घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यादरम्यान ४३ वर्षीय नाथा सर्जेराव बधक जखमी झाले,” अशी माहिती अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

सकाळी ९.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जखमी जवानाला उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागलेला फ्लॅट बंद होता. याठिकाणी एक कार्यालय आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.