आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी आली की, फटाक्यांच्या आवाजामुळे बसणाऱ्या कानठळ्या हे दर वर्षीचेच. परंतु, या वर्षी हा त्रास मंदावल्याचे दिसून येत आहे. फटाके वाजविण्याच्या वेळेवर आलेले बंधन, पोलिसांची कारवाई, ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत विविध स्तरांतून होणारी जागरूकता यामुळे या प्रकारच्या फटाक्याच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात घट दिसून आली आहे.

दिवाळीनिमित्त या वर्षीही मुंबईत बाजारात फटाके खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली आहे. मात्र अनेक जण फुलबाजा, पाऊस, आकाशात आतषबाजी करीत फुटणारे, रोषणाई फटाके किंवा कमी आवाजाचे फटाके विकत घेत आहेत. त्यामुळे  सुतळी, ताजमहाल, लवंगी बॉम्ब अशा कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांपासून मुंबईकरांना मुक्ती मिळाल्याचे दिसून येत आहेत. आकाशात फुटणारे फटाके हे आकर्षित करणारे असल्याने त्याकडे ग्राहकांचा कल जास्त आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सुतळी बॉम्बची मागणी मोठय़ा प्रमाणात घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या वर्षी बाजारात नया-नया प्यार, सिल्व्हर एड हे आकाशात फुटणारे फटाके नव्याने आले आहेत. आवाजविरहित फटाक्यांची मागणी ग्राहकांकडून होते आहे. तसेच या वर्षी सुतळी बॉम्बला फार काही मागणी नाही. अनेक ग्राहक फुलबाजे व पाऊस, भूचक्र या प्रकारच्या फटाक्यांना पसंती देत आहेत, असे क्रॉफर्ड मार्केमधील ‘ईसाभाई फायर वर्क्‍स प्रा. लिमिटेड’चे मालक घिया भाई यांनी सांगितले.

फटाक्यांच्या किमती

  • पाऊस – १२ नग – ७० रु.
  • फुलबाजा – १ बॉक्स – ५० रु.
  • आकाशात फुटणारे फटाके – ५०० रुपयांपासून पुढे
  • जमीन चक्री- १२ नग – ६० रु.

मुंबईत फटाके वाजविता येत नाहीत. त्यातच प्रदूषणाचा आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता या वर्षी आम्ही पाऊस आणि फुलबाजेच विकत घेतले आहेत. मोठे आवाजाचे फटाके फोडण्यापेक्षा लोकांच्या आरोग्याचा विचार करून इतरांनीही फटाके फोडावे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणितच होईल.

परशुराम राणे, ग्राहक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecrackers sound issue in mumbai