ठाणे येथील घोडबंदर भागातील ब्रह्मांडजवळ रविवारी रात्री मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कारमधील एका तरुणावर बंदुकीतून गोळीबार केला. पण, सुदैवाने तो यातून बचावला आहे. या हल्ल्यानंतर तरुणाने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोरांच्या मोटारसायकलला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक हल्लेखोर जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे पोलिसांनी वर्तविला आहे.
घोडबंदर परिसरातील ब्रह्मांड परिसरात राहणारे सुजीत मधुकर पाटील (३५) आणि त्यांचा मित्र प्रदीप शेरसिंग परिहार हे दोघे रविवारी रात्री त्यांच्या इमारतीखाली कारने आले. त्यानंतर सुजीत इमारतीच्या परिसरात कार पार्किंग करीत होते. त्यावेळी तेथे मोटारसायकलवरून दोन जण आणि त्यांचे साथीदार आले आणि त्यांनी सुजीत यांच्या दिशेने बंदूकीतून गोळीबार केला. सुमारे दोन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. या घटनेनंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी सुजीत यांनी कारने हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये नरेश भोजणे या नावाची व्यक्ती जखमी झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणी सुजीत आणि प्रदीप या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच नरेश दाखल असलेल्या रुग्णालयाभोवती पोलीस तैनात करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक होताच त्याला अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सुजीत पाटील हे भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये लेबर पुरविण्याचे काम करतात. काही वर्षांपूर्वी गोदामांमध्ये लेबर पुरविण्यावरून झालेल्या वादातून सुजीत आणि त्यांच्या भावाने एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दोन वर्षांपूर्वीच ते कारागृहातून बाहेर आले आहेत. दरम्यान, या वादातून सुजीत यांच्या भावाची नारपोली परिसरात हत्या झाली होती.