‘गधेगाळ’, ‘वीरगळ’ आदी शिलाकृतींसह पुरातन अवशेष आढळले; शिलाहार राजवटीतील ऐतिहासिक संदर्भ उजेडात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापुरातील ऐतिहासिक घडामोडींचा व मंदिरांचा ठेवा शिवकाल ते पेशवेकालापर्यंत मागे जात असला तरी आता यापेक्षाही प्राचीन काळातील इतिहासाचे महत्त्वाचे दुवे अभ्यासकांच्या शोधातून पुढे येऊ लागले आहेत. बदलापुरातील शिरगाव परिसरात शिलाहारकालीन राजवटीतील ‘गधेगाळ’ हा राजाज्ञा दर्शवणारा शिलालेख आढळला असून शहरानजीक बहुतांश मंदिरात पुरातन मंदिरे, विहिरी आदींचे अवशेष आढळू लागले आहेत.

बदलापूर गावात शिवाजी महाराज घोडे बदलत या आख्यायिकेवरून बदलापुराचे शिवकालाशी नाते सांगितले जाते, मात्र बदलापूर पूर्वेकडील महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून करण्यात आलेल्या रस्त्यालगत शेतावरील बांधावर ‘शिलाहारकालीन’ राजांच्या राजवटीतील ‘गधेगाळ’ हा शिलालेख हौशी अभ्यासक सचिन दारव्हेकर यांना आढळला आहे. या रस्त्यालगत शिरगाव हे गाव असून येथील गावदेवी मंदिरात हे शिळाशिल्प होते, मात्र काही कारणांमुळे शिळाशिल्प रस्त्यालगतच्या शेतात टाकून देण्यात आले. त्यामुळे सध्या ‘गधेगाळ’ हा शिलालेख उपेक्षित पडला आहे. आजही या गावदेवी मंदिराबाहेर पुरातन मंदिरांच्या खांबांचे अवशेष पडले असून त्यांना शेंदूर फासण्यात आल्याचेही दारव्हेकर यांनी सांगितले. तसेच बदलापूरजवळील राहटोली या गावात नारायण जाधव यांच्या शेतात फार पूर्वीपासूनच शिवलिंगसदृश शिळा होती. २०१३ मध्ये त्यांनी शेतीसाठी खोदाई केली असता त्यांना २० फूट लांबीचा जुनाट दगडी जोता आढळला त्यात अजून खोदाई केली असता किमान पाच फूट लांबीची शिवपिंडीच्या आकाराची मोठी दुसरी शिळा आढळली. येथे ‘वीरगळ’ हे शिळाशिल्प आढळले असून ते निर्माण करण्याची प्रथाही शिलाहार राजांच्या राजवटीतील होती.

माम्वाणी या शिलाहार राजाने इ.स. १०६० मध्ये अंबरनाथ येथे सुप्रसिद्ध ‘शिवमंदिरा’ची उभारणी केली. याच राजाच्या काळात हा ‘गधेगाळ’ शिलालेख उभारला गेल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने या शिलालेखाचे जतन करण्यात येईल, असे बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी सांगितले.

गधेगाळ व वीरगळ म्हणजे?

शिलाहार राज्यांच्या काळात राजाज्ञा मोडल्यास कठोर शिक्षा करण्यात येण्याची ताकीद म्हणून गाढव व स्त्रीचा समागम होत असल्याचे शिल्प कोरले जाई. यावर सूर्य, चंद्र व कलशांच्या प्रतिमा असून आकाशात चंद्र व सूर्य असेपर्यंत ही राजाज्ञा कायम राहील, असा त्या चिन्हांचा अर्थ असे. यालाच ‘गधेगाळ’ म्हणत. तसेच गावातील सैनिकास युद्धात वीरमरण आल्यास त्याची प्रतिमा असलेले शिल्प दगडात कोरले जात, त्यालाच वीरगळ म्हणतात.

बदलापूरनजीक शिरगाव व राहटोली येथे आढळलेल्या या दोन्ही शिळाशिल्पांची मी स्वत: पाहणी केली असून ती गधेगाळ व वीरगळ या प्रकारात मोडणारी आहेत. तसेच ही शिलाहार राजांच्या राजवटीतील असून यामुळे बदलापूरच्या इतिहासाला नवे संदर्भ मिळाले आहेत.

– सदाशिव टेटविलकर, इतिहासतज्ज्ञ.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Footprints of history shilahar in badlapur