मुंबई : दक्षिण कोरियन बँकेत बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बँक खाती उघडून ६२ कोटी रुपये किमतीचे परकीय चलन बेकायदा परदेशात पाठवल्याच्या आरोपाखाली बँकेच्या माजी कर्मचाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँक खाते उघडण्यामागे नेमका काय हेतू होता याचा पोलीस तपास करीत आहेत.
बँकेच्या कायदेशीर सल्लागाराने या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे २०२० मध्ये तक्रार केली होती. तक्रारीनुसार २०२० मध्ये मे. आयडी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांनी बँकेच्या मुंबईतील शाखेत, तर मे. लिकस ट्रेडर्स प्रा. लि. यांनी बँकेच्या नवी दिल्लीतील शाखेत बँक खाती उघडली होती. विशेष म्हणजे लिकसचे संचालक संतोष कुमार व आयडी टेक्नॉलॉजीजचे संचालक जुगेंद्र सिंह यांनी एकाच व्यक्तीच्या कागदपत्रांवर ही दोन बँक खाती उघडली. त्यातील लिकस या कंपनीतून देशांतर्गत व्यवहार करण्यात आले, तर आयडी टेक्नॉलॉजीज या कंपनीतून ९२ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर्स (६२ कोटी २२ लाख रुपये) अमेरिका व सिंगापूर येथील कंपन्यांना पाठविण्यात आले. दोन्ही बँक खाती बनावट कागदपत्रांच्या मदतीने उघडण्यात आल्यामुळे त्यातील व्यवहार संशयित असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर बँकेने ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली.
पोलिसांनी तोतयागिरी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे तो पुढे आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी लिकस बँकेचे संचालक संतोष कुमार यांच्या मोबाइल क्रमांकाची माहिती घेतली असता मोबाइल क्रमांक मिळविण्यासाठी वापरण्यात आलेले आधार कार्ड व बँकेचे माजी कर्मचारी सय्यद रझा नवाज नकवी यांचा आधार कार्डवरील छायाचित्र एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंपनी संचालकांनी नकवीच्या ओळखीचा वापर करून बँक खाती उघडल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी नकवीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती, पण ते उपस्थित राहिले नाहीत. अखेर ते नवी मुंबईत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून नकवीला अटक केली. या प्रकरणातील इतर संशयित आरोपींबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.