मुंबई : करोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अन्न आणि औषध प्रशासनाने गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने अटक केली.
या अवैध व्यवहारात गुंतलेल्या एका व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांना मिळाला होता. या क्रमांकावर औषधांची मागणी केली असता, ३० हजार रुपये दराने विक्री करण्याचे संबंधिताने मान्य केले. या औषधाची छापील किंमत पाच हजार ४०० रुपये इतकी असतानाही त्यासाठी ३० हजार रुपये आकारले जात होते.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम येथे शनिवारी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. विकास दुबे आणि राहुल गाडा हे रेमडेसिविर औषध घेऊन विक्री करण्यासाठी आले असता त्यांना पकडण्यात आले. अशा सहा कुप्या गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आल्या.
या अवैध व्यवहाराच्या साखळीमध्ये भावेश शहा, अशीष कनोजिया, रितेश ठोंबरे, गुरविंदर सिंग आणि सुधीर पुजारी (डेल्फा फार्मास्युटिकल, घाटकोपर) हे सामील असल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले. या सर्वाची चौकशी करून दोन ठिकाणी छापे घालून रेमडेसिविरची १३ इंजेक्शन्स जप्त करण्यात आली.
या कारवाईसाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या घाटकोपर युनिटचे साहाय्य घेण्यात आले. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापील दरापेक्षा जास्त दराने कुठल्याही प्रकारच्या औषधांची विक्री होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ / ०२२- २६५९२३६२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
