शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीप्रकरणी विद्यापीठाचा खुलासा
मुंबई विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २० मे रोजी होणाऱ्या सरळसेवा भरतीच्या लेखी परीक्षेकरिता ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज भरले आहेत त्यांनी कोणतीही एकच परीक्षा द्यावी, असा खुलासा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे.
सर्व पदांकरिता समान प्रश्नपत्रिका असून एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे त्या त्या पदाच्या गुणवत्तायादीत समाविष्ट करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच वेळी दोन ते तीन वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांची प्रवेशपत्रे धाडून विद्यापीठाने परीक्षेच्या तोंडावर घातलेल्या घोळाला ‘लोकसत्ता’ने १७ मे रोजी वाचा फोडली होती. राज्यभरातून १० हजार ६९१ उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत.
विद्यापीठातील कनिष्ठ टंकलिपीक, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, अभिलेख सहाय्यक आदी १४ प्रकारच्या सुमारे १२० पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा होणार आहे. पण, एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रत्येक पदासाठीचे वेगवेगळे परीक्षा ‘प्रवेशपत्र’ पाठवून विद्यापीठाने कोडय़ात टाकले होते. कारण सर्व पदांच्या लेखी परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २० मे रोजी होणार असून त्यांची परीक्षा केंद्रेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे, एकाच दिवशी दोन किंवा तीन परीक्षांना हजेरी कशी लावायची असा प्रश्न उमेदवारांना पडला होता. ‘लोकसत्ता’च्या वृत्ताचा खुलासा करताना विद्यापीठाने या उमेदवारांनी कोणतीही एकच परीक्षा द्यावी, असे स्पष्ट केले आहे. मुळात एकच परीक्षा घ्यायची होती तर विद्यार्थ्यांकडून प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे शुल्क कशाला आकारले, असा सवाल सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला.