नामांकित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएससारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या जागांवर आणखी पाच विद्यार्थ्यांनी गेल्या पाच वर्षांत बोगस जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नायर, केईएम आदी नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने नोटीस पाठवून बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल खुलासा मागविला आहे. विद्यार्थ्यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील. तसेच त्यांच्यावर बनावट प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल फौजदारी कारवाईही करण्यात येईल. या आधी १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश या कारणावरून रद्द होऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली होती. आता ही संख्या २४वर जाणार आहे.

अनुसूचित जमातींकरिता सरकारी महाविद्यालयांमध्ये राखीव असलेल्या जागांवर २०१२-२०१६ या काळात १९ विद्यार्थ्यांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश घेतल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २२ जुलैला प्रसिद्ध केले होते. त्यानंतरही वेळोवेळी या प्रकरणाचा मागोवा घेत वैद्यकीयबरोबरच व्यवस्थापन अभ्यासक्रमातही विद्यार्थी बनावट जात पडताळणी प्रमाणपत्रांआधारे कसे प्रवेश घेत आहेत, यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकला होता. या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने एमबीबीएस-बीडीएसला जेजे, नायर, केईएमसारख्या नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविलेल्या १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले. एमबीएच्या १७ विद्यार्थ्यांचेही प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयाला रद्द करायला लागले होते.

इतकेच नव्हे तर आदिवासी विकास विभागानेही व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील या प्रवेश घोटाळ्याची दखल घेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या राखीव जागांवर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत २०१२ ते २०१६ या काळात आणखी पाच विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे निष्पन्न होत आहे. ही संख्या आणखीही वाढू शकेल, असा अंदाज वैद्यकीय शिक्षण संचालनायातील सूत्रांनी व्यक्त केला.

संचालनालयाने गेल्या पाच वर्षांत अनुसूचित जमातीसाठीच्या राखीव जागांमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली आहे. ‘आतापर्यंत एकूण सात विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे नंदूरबारच्या जात पडताळणी समितीने संचालनालयाला कळविले आहे. त्यापैकी २०१६च्या दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र उर्वरित पाच विद्यार्थी निरनिराळ्या सरकारी महाविद्यालयात शिकत आहेत. त्यामुळे त्यांना आपण सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितला आहे. त्यांचा खुलासा समाधानकारक आढळून न आल्यास त्यांचे प्रवेश रद्द करावे लागतील. तसेच त्यांच्यावर बोगस प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल,’ असेही वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट  केले.

बनावट प्रमाणपत्र सादर करणारे विद्यार्थी, महाविद्यालय आणि प्रवेशाचे वर्ष

१) रूही खान-सेंट जॉर्ज महाविद्यालय(बीडीएस)-२०१२

२) समरीन कुरेशी-नायर महाविद्यालय (एमबीबीएस)-२०१५

३) ओबीदुल्ला खान-सायन हॉस्पिटल (एमबीबीएस)-२०१२

४) सुभानअली शेख-केईएम (एमबीबीएस)-२०१३

५) सुमय्या खान-सायन हॉस्पिटल (एमबीबीएस)-२०१६

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government medical colleges students gave fake caste certificates