ल्युमिएर बंधूंनी १८९६ साली मुंबईकरांना धावत्या ट्रेनची रिळे दाखवली तेव्हा पडद्यावरची ती ट्रेन आपल्या अंगावर येईल की काय या भितीने लोक सभागृह सोडून उठले होते. त्यानंतर काही वर्षे लोटली तेव्हा दादासाहेब फाळके  यांनी चित्रपट नावाची ही पडद्यावरची जादू इथे जिवंत केली. १९१३ साली मूकपटाने ज्या भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली ती आज शंभर वर्षांनंतर बॉलिवूड नामक चित्रपट उद्योग म्हणून ओळखली जाते. या शंभर वर्षांत कितीतरी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, चित्रपटनिर्मितीतले बदलते प्रवाह, समाजमनावर पडणारा त्याचा प्रभाव अशा कितीतरी गोष्टी बॉलिवूडचा इतिहास म्हणून जमा झाल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या या शतकपूर्ती वर्षांच्या निमित्ताने शंभर वर्षांच्या चित्रपट इतिहासात दडलेल्या अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न हिस्ट्री वाहिनीच्या ‘बॉलिवुड@१००’ या कार्यक्रमात केला जाणार आहे.
हिस्ट्री वाहिनीने याआधी ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मिळालेला चांगला प्रतिसाद लक्षात घेत ‘बॉलिवुड@१००’ या कार्यक्रमाची निर्मितीही आपणच करावी, असा निर्णय वाहिनीच्या सूत्रांनी घेतला. आजपासून सुरू होणाऱ्या या दहा भागांच्या मर्यादित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, माधुरी दीक्षित, जावेद अख्तर असे एक काळ गाजवणारे कलाकार आणि आमिर खान, शाहरूख खान, ए. आर. रेहमान, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा असे आत्ताचा काळ गाजवणारे कलाकार यांच्या तोंडून अनेकविध किस्से-अजरामर चित्रपटांच्या आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. ‘बॉलिवुड@१००’ हा कार्यक्रम हिस्ट्री वाहिनीच्या माध्यमातून जगभरात दाखवला जाणार आहे. त्यामुळे बॉलिवूडकडे पाहण्याचा एक वेगळा ऐतिहासिक दृष्टिकोन आणि या उद्योगाची आत्तापर्यंतची वाटचाल ही वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास वाहिनीचे अध्यक्ष अजय चाको यांनी व्यक्त केला आहे.