पुढील आठवडय़ापासून प्रारंभ, नवी संगणकीय प्रणाली कार्यान्वित
मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांची थेट ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग सज्ज झाला असून २ ऑक्टोबरपासून नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
विकासकांना ऑनलाइन दस्त जमा नोंदवता येणार आहेत. पुढील आठवडय़ापासून नव्या प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ होणार असून सध्या ५० पेक्षा जास्त घरे असलेल्या गृहप्रकल्पातील घरांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. त्याच वेळी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचारी तसेच विकासकांना नव्या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात महारेरा नोंदणीकृत मोठय़ा प्रकल्पातील पहिल्या विक्रीतील घरांसाठी ऑनलाइन नोंदणी ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर साधारणत: वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीत अनेक त्रुटी होत्या. तसेच व्यापक स्वरूपात ऑनलाइन नोंदणी सुरू करावी लागणार असल्याने नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रणाली तयार झाली असून त्याच्या चाचण्याही झाल्या आहेत. २ ऑक्टोबरपासून ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यावर दस्त नोंदवता येतील. पुढील आठवडय़ापासून नोंदवण्यात आलेल्या दस्तानुसार ऑनलाइन नोंदणी करून दिली जाईल अशी माहिती महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर यांनी दिली. सध्या तरी ५० पेक्षा अधिक घरे असलेल्या महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांची नोंदणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आता ग्राहकांना विकासकांच्या कार्यालयात त्यांच्या सोयीनुसार जाऊन करारनाम्याची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ही खूप मोठी दिलासादायक बाब असल्याचे क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गरोडिया यांनी सांगितले.
तीन हजार घरे टाळेबंदीच्या काळात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन नोंदणीस सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत ३५८ प्रकल्पातील ३००० घरांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.