गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूका डिसेंबर अखेपर्यंत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. या निवडणूका महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थामधील नियुक्त्यांना पुन्हा एकदा गती येण्याची चिन्हे असून काही ठिकाणी असलेली वादाची प्रकरणेही मार्गी लागू शकतील, असा विश्वास  दि ठाणे डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटीव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य शासनाने ९७ व्या घटना दुरूस्तीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण, या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबर २०१३ पर्यंत घेण्याचे शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या रखडलेल्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूका डिसेंबर २०१२ ते २०१३ या कालावधीत होणार होत्या. त्या सर्व निवडणूका डिसेंबर २०१३ पर्यंत शासनाने घेण्याचे ठरविले आहे. या सर्व निवडणूका महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहेत.