एखाद्या व्यक्तीसोबत आपण अनेक वष्रे घालवली तरी आपल्याला त्या व्यक्तीबाबत परिपूर्ण माहिती आहे, असे आपण म्हणू शकत नाही. यातूनच अनेकदा मैत्री आणि नात्यांमध्ये होणारे वाद पेटून उठतात, पण हे वाद कंपन्यांना परवडणारे नसतात. यामुळे आपण नेमत असलेला माणूस नेमका कसा आहे, त्याची पदवी खरी आहे की खोटी, त्याने दिलेली माहिती खरी आहे की खोटी, तो कोणत्या भागात राहतो, कोणत्या शाळेत शिकला, त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून मगच त्या माणसाची नियुक्ती केली जाते. कंपन्यांना हे काम करण्यासाठी स्वत:चे मनुष्यबळ खर्च करावे लागू नये आणि काम अचूक व्हावे या उद्देशाने ‘आयडीएफआय’ या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने सुमारे लाखभर लोकांची माहिती तपासून पाहिली आहे.
असा झाला कंपनीचा प्रवास
देशात कॉर्पोरेट्स कंपन्यांचे वारे वाहू लागले आणि त्यांनी चांगलाच जम बसवला. तेथून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. मात्र त्याचबरोबर कंपन्यांना काही समस्याही जाणवू लागल्या. अनेकदा कंपन्यांना त्यांनी निवडलेल्या उमेदवारांनी दिलेली माहिती चांगली वाटायची. पण प्रत्यक्षात काम करताना मात्र तो उमेदवार कमी पडायचा. अनेकदा खोटय़ा माहितीच्या आधारे नोकरी मिळवल्याचे प्रकारही घडू लागले. यातूनच कंपन्यांनी उमेदवाराची निवड करण्यापूर्वी त्याचा संपूर्ण तपशील तपासून घेण्याचा ठरविले. यात उमेदवार कोणत्या शाळेत शिकला इथपासून ते तो कोठे राहतो, त्याचा स्वभाव, काम करण्याची पद्धत इथपर्यंतचा तपशील कंपन्या तपासून घेऊ लागल्या. मात्र मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या भरती प्रक्रियेवेळी कंपन्यांना प्रत्येकाकडे जाऊन ही माहिती तपासून घेणे शक्य नसते. कंपन्यांची ही गरज भागविण्याच्या उद्देशाने मे २०११ मध्ये अशोक हरिहरन आणि विनीत जावा यांनी ‘आयडीएफवाय’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून बडय़ा कंपन्यांमधील मनुष्यबळ विकास विभागाला योग्य माणसाची निवड करण्याचे काम सोपे झाल्याचा विश्वास हरिहरन यांनी व्यक्त केला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत कंपनीने मुंबईसह बेंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
असा उभा राहिला निधी
कंपनी स्थापन करण्यासाठी ब्लूम वेंचर्स, एनईए आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास विभागाची निर्णयप्रक्रिया अधिक अचूक आणि सोपी व्हावी, या उद्देशाने आम्ही व्यवसायात सातत्याने नावीन्यपूर्ण बदल करत असल्याचेही हरिहरन यांनी सांगितले.
असे चालते काम
या कंपनीमार्फत उमेदवाराचा संपूर्ण तपशील गोळा केला जातो आणि त्याने सादर केलेली माहिती खरी आहे की खोटी हेही तपासून घेतले जाते. याचा तपशील कंपन्यांना पुरविला जातो व कंपन्या त्याच्या आधारे उमेदवाराची निवड करत असतात. याचबरोबर या कंपनीने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन उच्चशिक्षण नसलेल्या म्हणजे डिप्लोमाधारक किंवा गाडय़ांचे चालक अशा लोकांची माहितीही गोळा करून ती पडताळून घेतली आहे. जेणेकरून उबेरसारख्या कंपनीला जर कधी वाहनचालकाची गरज भासली आणि तो चालक कसा आहे याचा तपशील जर त्यांना माहिती करून घ्यायचा असेल तर या कंपनीच्या माध्यमातून तो उपलब्ध होऊ शकणार आहे. याचबरोबर कंपनी उबेर आणि चालकाला जोडण्याचेही काम करणार आहे. याचबरोबर प्लम्बर, कार्पेटर अशी कामे करणाऱ्या लोकांबाबतही समाजात असुरक्षितता आहे. यामुळे अशा लोकांचीही माहिती पडताळून त्यांच्या तपशिलाचा साठा कंपनीने केला आहे. यासाठी कंपनीने ‘वनआयडी’ मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत त्या लोकांना एक ओळखपत्र देण्यात आले आहे. जेणेकरून या लोकांबाबत सामान्यांना विश्वास वाटेल आणि त्यांना कामही मिळेल. यामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांना त्यांची ओळख प्रस्थापित करणे सोपे जाणार असल्याचे हरिहरन यांनी स्पष्ट केले.
ही सेवा पुरविण्यासाठी कंपनी बडय़ा कंपन्यांकडून पैसे आकारते. यामुळे ज्या व्यक्तीबद्दल माहिती तपासून घ्यायची आहे त्या व्यक्तीला यासाठी खर्च येत नाही.
भविष्याची वाटचाल
भविष्यात कंपनीला जास्तीत जास्त लोकांची माहिती गोळा करावयाची आहे. याचबरोबर कंपन्यांपुरती मर्यादित सेवा वैयक्तिक लोकांपर्यंत पोहोचवली जाण्याचा मानस हरिहरन यांनी व्यक्त केला. म्हणजे कंपनी लग्नापूर्वी वधू किंवा वर कसा आहे याचा तपशील देऊ शकते. याचबरोबर जर कुणाला आपले घर भाडय़ाने द्यायचे असेल तर ती व्यक्ती कशी आहे याची माहितीही उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असल्याचे हरिहरन यांनी सांगितले.
नव उद्योजकांना सल्ला
उद्योजकांनी व्यवसायाची निवड करत असताना आपल्यासमोर काय समस्या आहेत, त्यावर काय तोडगा निघू शकतो याचा विचार करून व्यवसायाची निवड करावी. आपण सुरू केलेला व्यवसाय पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्णत: स्वावलंबी होईल का, याचा विचार करणेही महत्त्वाचे असल्याचे हरिहरन यांनी सांगितले. याचबरोबर व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.
नीरज पंडित niraj.pandit@gmail.com