परदेशी विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षी पहिलाच प्रयोग
परदेशातील विद्यार्थ्यांनी भारतातील तंत्रज्ञान शिक्षण संस्थांमध्ये येऊन प्रशिक्षण घ्यावे या उद्देशाने पहिल्यांदाच देशातील आयआयटीसाठीची प्रवेश परीक्षा परदेशात घेतली जाणार आहे. सिंगापूर, यूएई, इथिओपिआ आणि सार्कमधील चार देशांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांची अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्कमधील देशांबरोबरच आफ्रिकेतील इथिओपिआ, सिंगापूर आणि यूएई या देशांतील अधिकाऱ्यांशी एक बैठक झाली. या बठकीत सर्व देशांनी त्यांच्या देशात आयआयटीची प्रवेश परीक्षा घेण्यास मान्यता दिली. यापूर्वी परदेशात आयआयटीची प्रवेश परीक्षा झाली होती, मात्र ती केवळ भारतीयांसाठीच खुली होती. मात्र आता ही परीक्षा परदेशी विद्यार्थ्यांसाठीही खुली करण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जेईई आणि जीएटीही या परीक्षा परदेशी विद्यार्थ्यांसाठीची पहिल्यांदा २०१७ मध्ये पार पडणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ही परीक्षा आयआयटी आणि त्या देशांतील भारतीय दूतावासांच्या माध्यमातून पार पडणार आहे. या अभ्यासक्रमांना परदेशी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने देशातील १८ आयआयटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागा कुठल्याही प्रकारे कमी होणार नसल्याचेही यावेळी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच या परदेशी विद्यार्थ्यांकडून शुल्कही अतिरिक्त आकारले जाणार आहे. या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी संशोधन व्हिसा देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी यावेळी सांगितले आहे. या परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून परदेशात प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी त्या संदर्भातील आवश्यक ती माहिती पुस्तके तयार करण्याची जबाबदारी मुंबई आयआयटीवर सोपविण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय क्रमवारी सुधारण्यास मदत
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ (आयसीसीआर) समन्वयक संस्था म्हणून काम पाहणार आहे. अशा प्रकारची परीक्षा परदेशात व्हावी याबाबत चेन्नई येथील आयआयटीच्या संचालकांनी एक अहवाल सादर केला होता. देशातील आयआयटीमध्ये परदेशी विद्यार्थी शिकण्यास आल्यामुळे संस्थांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी सुधारण्यास मदत होईल. तसेच भारतातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही निश्चितपणे मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iits to hold entrance exam abroad for foreign students