कत्तलीची परवानगी नसलेल्या बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर निर्बंध आले असून बकऱ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी जारी केले. कायदेशीर तरतुदींचा विचार न करता कुर्बानीसाठी मुंबईत आणल्या जाणाऱ्या बकऱ्यांच्या वाहनांची कोणतीही तपासणी पोलिसांनी करू नये, असे आदेश देणारे परिपत्रक दोन दिवसांपूर्वी जारी करण्यात आले होते. ‘प्राणी कल्याण मंडळा’च्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी पोलीस आयुक्तांकडे तीव्र आक्षेप नोंदविल्यावर सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत.

बकरी ईद २ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून कुर्बानीसाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणावर बकरे मुंबईत आणले जातात. त्यांना आणणाऱ्या वाहनांकडे कागदपत्रांची मागणी पोलिसांकडून केली जाते, त्रास दिला जातो, अशा तक्रारी मुस्लीम धर्मीयांकडून करण्यात आल्या. त्यामुळे बकरे असलेल्या वाहनचालकांकडून पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मागू नयेत, वाहनचालकाचा परवाना किंवा वाहनाची कागदपत्रांचीही चौकशी करू नये, अन्यथा पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश २६ ऑगस्ट रोजी सहआयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले होते. पशुवैद्यकांनी परवानगी दिलेल्या पशूंचीच किंवा बकऱ्यांचीच कत्तल व वाहतूक करता येते. त्यासाठी ‘प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० (प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट) कायद्यातही तरतुदी आहेत. कत्तलीसाठी बेकायदेशीर पशू वाहतुकीला आळा घालण्याची व कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. तरीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, यासाठी बकऱ्यांची वाहतूक करणारी वाहने कोणत्याही तपासणीशिवाय बिनबोभाटपणे मुंबईत यावीत, असे फर्मान अमितेश कुमार यांनी काढले होते.त्याला खासदार पूनम महाजन यांनी तीव्र आक्षेप घेऊन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार केली. कत्तलीसाठीच्या पशूंच्या वाहतुकीबाबत कायदेशीर तरतुदी आहेत. त्या दोन दिवसांसाठी स्थगित ठेवता येणार नाहीत. सहआयुक्तांचे परिपत्रक बेकायदा असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे चक्रे फिरली आणि सुधारित आदेश जारी करण्यात आले.