मुंबई : सर ज. जि कला महाविद्यालयाचे रूपांतर राज्याच्या कला विद्यापीठात करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येणार असला तरी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदींचा विचार करता या विद्यापीठाच्या स्थापनेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांची संख्या कमी करण्याचे धोरणात नमूद असताना राज्यातील महाविद्यालये कला विद्यापीठाच्या छताखाली आणण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

केंद्राकडून अभिमत विद्यापीठासाठी अटीसापेक्ष तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर या संस्थेचे रूपांतर राज्य शासनाच्या अखत्यारीतील विद्यापीठात करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हे शासकीय प्रयत्न राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदींशी फारकत घेणारे असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये कमी करण्याचे धोरण आहे. मात्र त्याच वेळी शासनाने राज्य कला विद्यापीठ स्थापन झाल्यास त्याच्याशी राज्यातील कला महाविद्यालये संलग्न करण्याचा मानस व्यक्त केला आहे. राज्यात सध्या बहुतांशी महाविद्यालये ही पदविका अभ्यासक्रमाची आहेत. त्यामुळे त्यांना विद्यापीठाशी संलग्न करणे शक्य होणार नाही.

या पार्श्वभूमीवर सर ज. जि. कला महाविद्यालय समूहाचे राज्याच्या विद्यापीठात रूपांतर करणे शक्य होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

माजी विद्यार्थ्यांची मोहीम

सर ज. जि महाविद्यालयांच्या समूहाचे अभिमत विद्यापीठ व्हावे यासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आवाहन याचिका केली असून त्याला पहिल्याच दिवशी हजारापेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

समितीच्या अहवालानुसार निर्णय : सामंत

सर ज. जि. कला महाविद्यालयासह उपयोजित कला, वास्तुकला महाविद्यालयाचे विद्यापीठ करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते होऊ शकते का याबाबत नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या अहवालानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे  उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने घातलेल्या अटींची पूर्तता तीन वर्षांत होणे शक्य नाही, म्हणून राज्य विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार करण्यात येत आहे. ज. जि. महाविद्यालयाबाबत आयोगाकडे कागदपत्रे पोहोचलेली नाहीत. त्याचबरोबर राज्य विद्यापीठ झाल्यास इतर महाविद्यालये त्याच्याशी संलग्न करता येतील आणि त्याच्या लौकिकाचा त्या महाविद्यालयांनाही फायदा होईल. कला हा वेगळा विषय आहे, त्यासाठी इतर शिक्षण संस्थांप्रमाणे निकष लावणे उचित ठरणारे नाही. त्याचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे, असेही सामंत म्हणाले.