शैलजा तिवले

गणेशोत्सवात बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, टाळेबंदी शिथिलीकरणाबरोबर मुखपट्टीचा वापर आणि सुरक्षित अंतराबाबत सुटलेले भान यामुळे ऑगस्टमध्ये ओसरू लागलेला करोनाचा संसर्ग मुंबईत पुन्हा वाढू लागला आहे. शहरात दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि आढळलेले बाधित रुग्ण याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढले. त्यामुळे बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्या वाढली हे काही अंशी खरे असले तरी शहरात संसर्गप्रसार वाढल्याचे स्पष्ट होते.

ऑगस्टमध्ये मुंबईत प्रतिदिन रुग्णसंख्या सर्वसाधारणपणे एक हजार किंवा त्याहून कमी नोंदली जात होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्यांची संख्या आठ ते नऊ हजार झाली आणि बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पालिकेने दर दिवशी चाचण्यांची संख्या सुमारे १५ हजारांवर नेली. त्या तुलनेत दर दिवशीची रुग्णसंख्याही जवळपास अडीच हजारांहूनही अधिक नोंदली गेली. दर दिवशी चाचण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दावा पालिकेने केला तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

तरीही अत्यल्पच..

ऑगस्टमध्ये संसर्गाचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते; परंतु सप्टेंबरमध्ये संसर्गप्रसार वाढल्याने बाधितांचे प्रमाण पुन्हा १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत अत्यल्प चाचण्या केल्या जात असून दर दिवसाचे चाचण्यांचे प्रमाण ५० हजारांवर नेणे गरजेचे आहे. तेव्हा मुंबईचा मृत्युदर आणि बाधितांचे प्रमाणही कमी होईल, असे शहराच्या करोना विशेष कृतिदलाचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

सक्रिय रुग्णांची संख्या ठाण्याहून अधिक

सक्रिय रुग्णांच्या संख्येत मुंबईने पुन्हा एकदा ठाण्याला मागे टाकले आहे. मंगळवारी ठाण्यातील सक्रिय रुग्णसंख्या २९,२३९ नोंदली, तर मुंबईत ही संख्या ३०,९३८ वर गेली आहे.

पालिकेचे म्हणणे..

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वर्दळ वाढली. अनेक ठिकाणी मास्क आणि सुरक्षित अंतर याचे पालनही केले जात नाही. त्यामुळे प्रसार अधिक वाढत आहे. पालिके ला मास्क न घातलेल्यांवर कारवाई करण्याची वेळ आली. तेव्हा नागरिकांनी योग्य रीतीने काळजी घेतल्यास संसर्ग पुन्हा आटोक्यात येईल. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला प्रतिसाद देत चाचण्या केल्यास संसर्ग रोखण्यास अधिक मदत होईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

चाचण्यांची स्थिती..

मुंबईत आत्तापर्यंत ९,३६,५७४ करोना चाचण्या झाल्या असून दर दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ७२ हजार आहे. देशात सर्वाधिक चाचण्या दिल्लीत झाल्याची नोंद असून १९,०३,७६२ चाचण्या झाल्या आहेत. दर दहा लाख लोकसंख्येमागे १,००,१९८ चाचण्या केल्या जातात. या खालोखाल बंगळूरुमध्ये आत्तापर्यंत १२,३५,८८० चाचण्यांची नोंद आहे, तर दर दहा लाख लोकसंख्येमागे ९५,०६८ चाचण्या केल्या जातात.