उपचार, लसीकरणाची सुविधा नाही; उपचारासाठी मीरा-भाईंदरमार्गे बोरिवलीत

इंद्रायणी नार्वेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबईच्या कुशीत वसलेले आणि तरीही मुंबईपासून काहीसे आलिप्त असलेले बोरिवलीजवळील गोराई गावातही आता करोनाचा संसर्ग पोहोचला आहे. मात्र बोटींची सोय नसल्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी कि ंवा लसीकरणासाठी मीरा-भाईंदरमार्गे बोरिवलीत यावे लागत आहे. त्यामुळे गोराई गावातच लसीकरण केंद्र व विलगीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी गावकरी करू लागले आहेत.

मुंबईपासून जवळ आणि तरीही मुंबईपासून काहीसे विलग असलेले गोराई गाव करोनाच्या दोन लाटांमध्ये काहीसे विलगीकरणातच होते. गोराई जेट्टीवरून बोटीने या गावात जावे लागते. मात्र टाळेबंदीच्या काळात बोटी बंद असल्यामुळे हे गाव आपोआपच करोनापासून सुरक्षित राहिले. गेल्यावर्षी रस्त्यावरून मीरा-भाईंदरमार्गे येणाऱ्या वाहनांवरही नागरिकांनी पाळत ठेवून बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश करू दिला नाही. मात्र दुसऱ्या लाटेच्या अखेरीस या गावात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. मात्र, आता गावातील लोकांना उपचारासाठी मुंबईत येणेही मुश्कील झाले आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर सध्या बोटसेवा सुरू झालेली असली तरी बोटीची एकच फेरी चालू आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तेथील नागरिकांना मीरा भाईंदरमार्गे प्रवास करून उपचारांसाठी मुंबईत दाखल व्हावे लागते आहे. त्यामुळे या गावातच एखादे विलगीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी गावकरी करू लागले आहेत. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी याप्रकरणी पालिका आयुक्तांना व आर मध्य विभाग कार्यालयाला पत्र पाठवून स्वतंत्र लसीकरण केंद्राची व विलगीकरण केंद्राची मागणी के ली आहे.

या गावाने पहिल्या लाटेत स्वत:ला सुरक्षित ठेवले, पण आता गावात विलगीकरण केंद्र दिले तर डॉक्टर, आरोग्यसेवक यांचा वावर गावात वाढेल आणि करोना पसरण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यापेक्षा रुग्णांनी रुग्णवाहिकेतून मुंबईत येऊन येथे विलगीकरणात राहावे, हे जास्त सोयीस्कर ठरेल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त के ले.

लसीकरणापासूनही वंचित

करोनाचा रुग्ण आढळ्यास अपुऱ्या सुविधांमुळे घरातच विलगीकरणात राहणे शक्य नाही. तसेच बोट बंद असल्यामुळे ३० ते ३५ किमी अंतर कापून लसीकरण केंद्रावर पोहोचावे लागते. तेथे अगोदरच बोरिवलीतील स्थानिकांनी रांग लावलेली असते. त्यामुळे येथील रहिवासी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.

गोराई गावाची लोकसंख्या पाच हजार आहे. त्यांच्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी डॉक्टर, रुग्णवाहिका, परिचारिका यांचीही व्यवस्था करावी लागणार आहे.

– भाग्यश्री कापसे, साहाय्यक आयुक्त, आर उत्तर विभाग

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infection corona first wave survived ssh